अनुवेध मधून पुण्यातील कथक कलाकारांनी साजरा केला ‘डान्स सिझन २०१९ ’

पुणे, दि ३० एप्रिल, २०१९ : पुण्यातील शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या वतीने जागतिक नृत्यदिनाचे औचित्य साधत कथक गुरू पंडिता मनीषा साठे यांच्या मनीषा नृत्यालय परिवाराने ‘अनुवेध’ या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी पुण्यातील अनेक कथक कलाकारांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला.

पुण्यातील सर्व नृत्यप्रकारातील कलाकारांनी एकत्र येत शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेची स्थापना केली असून या अंतर्गत यावर्षी त्यांनी ‘डान्स सिझन २०१९’ चे आयोजन केले होते. यानिमित्तांचे ‘अनुवेध’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात स्वतः पंडिता मनीषा साठे यांनी नांदी व नाट्यगीत सादरीकरणाने केली. त्यानंतर त्रिवट, ठुमरी, अर्धनारीनटेश्वर स्तोत्र, कुमार गंधर्वांची लोकगीत बाजाची रचना, सरगम एक्सप्रेस, तराणा, विक्रम घोष यांची सांगीतिक रचना, तुलसीदास पद, दुर्गास्तुती, शिवतांडव, संयुज अशा एकाहून एक सरस व खिळवून ठेवणाऱ्या नृत्यरचना यावेळी सादर झाल्या.

मंजिरी कारुळकर, शिल्पा दातार, माधुरी आपटे, तेजस्विनी साठे, मानसी गदो, पूर्वा शाह, पद्मश्री जोशी, मुग्धा पाठक, पायल गोखले, स्वरश्री सुमंत, मिथिला भिडे, गौरी स्वकुळ, ईशा काथवटे या गुरू मनीषाताईंच्या शिष्यांनी आपापल्या नृत्यसंस्थेतील विद्यार्थिनींसह एकेक रचना सादर केली. वैविध्यपूर्ण संगीत, पेहराव, उत्तम संरचनात्मक विचार आणि नजरेत भरावे असे देखणे नृत्य हे ह्या मैफिलीचे वैशिष्ट्य ठरले.