आमटे कुंटुंबाने आदिवासींना माणसात आणले
आमटे कुंटुंबाने आदिवासींना माणसात आणले
ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांचे प्रतिपादन
‘लोकबिरादरी’च्या हस्तकला व छायाचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
पुणे : ‘‘थोर समाजसेवक बाबा आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आदिवासींच्या भागांत वास्तव्य करुन आदिवासींना माणसांत आणण्याचे मोठे कार्य केले आहे. आदिवासींची मूळं अबाधित ठेवतानाच आमटेंनी आदिवासींना मुख्य धारेत आणण्याचा प्रयत्नही केला. माणसांच्या अस्तित्वाचेच राजकारण करण्याच्या सध्याच्या काळातही निव्वळ समाजसेवेच्याही पलीकडे जाणारा एक सुनियोजित, पारदर्शी विचार आमटे कुटुंबाने मांडला आहे,‘‘ असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी केले.
लोकबिरादरी मित्र मंडळ, पुणे आयोजित ‘डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या छायाचित्र व बांबू हस्तकला प्रदर्शना’चे उद्घाटन पेठे यांच्या हस्ते नुकतेच झाले. या वेळी डॉ. आमटे यांचे सहकारी जगन मचकले, अनिकेत आमटे, समीक्षा आमटे, असीम सरोदे, शिल्पा तांबे, योगेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. बालगंधर्व कलादालनात गुरुवारपर्यंत (ता. २४) सकाळी ९ ते रात्री साडेआठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.
पेठे म्हणाले, ‘‘प्रेरणेचा आणि इतिहासाचा वारसा समजून घेत त्यात नव्याने भर घालत राहणे महत्त्वाचे असते. आमटे कुटुंबाने आनंदवनात आणि लोकबिरादरी प्रकल्पात हेच प्रत्यक्षात घडविले आहे. त्यांनी तेथे वास्तव्य केले. मात्र, खाणी उभारल्या नाहीत; तर त्यांनी तेथील लोकांसाठी दवाखाने काढले. या कुटुंबाचे समाजकार्य हे ‘फॅशनेबल’ नाही. ते थेट वास्तवाला भिडणारे, जमिनीवरचे आणि प्रसंगी स्वतःलाही सोलवटून काढणारे आहे आणि म्हणूनच ते कामअधिक महत्त्वाचे ठरते.’’
‘‘अत्यंत प्रेरणादायी लेखणीतून जन्मलेल्या बाबा आमटेंच्या कवितांनी एकेकाळी आमच्यापैकी अनेकजण भारावलेले असायचे. बाबांच्या ‘ज्वाला आणि फुले’मधल्या कविता मनाला स्पर्श करतात. त्या माझ्या तोंडपाठ असत. खर्या अर्थाने तरुण व्हायचे असेल आणि एखाद्या सामाजिक विषयाला धरून बंडखोरी करायची असेल, तर आमटेंचे साहित्य वाचणे अनिवार्य ठरावे; एवढे प्रभावी ते लिहीत असत,’’ असेही पेठे यांनी नमूद केले.
ऍड. असीम सरोदे यांनीही मनोगत व्यक्त केले. अनिकेत आमटे यांनी आभार मानले. लोकबिरादरी प्रकल्पातील गेल्या ४२ वर्षांतील वाटचालीचे काही थरारक क्षण जिवंत करणारी सुमारे २०० छायाचित्रे, तेथील उपचारपद्धती, जीवनमान चित्ररुपात पाहायला मिळणार आहेत. त्याशिवाय, प्रकल्पात आदिवासींनी स्वतः तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या; तसेच दैनंदिन उपयोगाच्या वस्तू आहेत. विलोभणीय असे हे प्रदर्शन प्रत्येकाने पहावे, असेच आहे.