आर्थिकदृष्ट्या दुर्बल-वंचित मुलांनी घेतले शास्त्रीय नृत्याचे धडे

पुणे, दि. २७ एप्रिल २०१९ : शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था (एसएनएसएस) आयोजित ‘डान्स सिझन २०१९’ अंतर्गत नृत्यांजली नृत्य संस्थेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित मुलांसाठी भरतनाट्यम् च्या नृत्य कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल १५० विद्यार्थ्यांनी त्याचा आनंद घेतला. येत्या सोमवारी दि. २९ एप्रिलला जागतिक नृत्यादिनाचे औचित्य साधत कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सभागृहांमध्ये सायंकाळी ७ वाजता त्यांचा एकत्रित कार्यक्रम देखील होणार आहे. या ठिकाणी ही सर्व मुले आपले सादरीकरण करतील.

शास्त्रीय नृत्य केवळ ठराविक गटापुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य प्रत्येकापर्यंत पोहचावे या उद्देशाने शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था स्थापना झाली. त्यानुसार नृत्यांजली नृत्य संस्थेच्या गुरु वैशाली पारसनीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शाखेच्या ज्येष्ठ शिक्षिका व शिष्यांच्या सहकार्याने २० ते २८ एप्रिल दरम्यान या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापक मंडळ सदस्या विद्या देशपांडे प्रमुख पाहुण्या असून एसएनएसच्या अध्यक्षा, प्रसिद्ध कथक नृत्यांगना गुरु शमा भाटे, प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना व एसएनएस सदस्या गुरु डॉ. सुचेता चापेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम निःशूल्क असून सर्वांसाठी खुला आहे.