कष्ट आणि चिकाटी हीच माझ्या यशाची गुरुकिल्ली : खासदार गिरीश बापट

पुणे: टेल्को मध्ये काम करत असताना लागलेली कष्टाची सवय आणि काम करत असताना आलेली चिकाटी हीच माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे माझ्या यशात टाटा परिवाराचा सिंहाचा वाटा आहे असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पुणे शहर लोकसभा मतदार संघातून विक्रमी मतांनी निवडून आल्याबद्दल टेल्को मधील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

खासदार बापट म्हणाले, सध्या आपण औद्योगिकरण, कामगार, मालक असे शब्द ऐकतो मात्र टाटा मध्ये परिवार हा शब्द रूढ झाला आहे. या परिवारा मार्फत माझा सत्कार होतोय याचा मला आनंद होत आहे. टेल्को मध्ये असताना खूप काम करत होतो. कोणतंही काम करताना कधी कामाची लाज बाळगली नाही. तसेच काम करत असताना वरिष्ठ प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून चिकाटीने कामे करून घेत असत, ही जिद्द आणि चिकाटी माझ्या अंगी आपसूकच आली. याचा मला आजही फायदा होत आहे. टाटांनी कधीही परिवारा पेक्षा देशाला आणि समाजाला महत्व दिले. हाच संस्कार माझ्यावरही झाला. आजही मी सत्ता आणि पैशाला फार महत्व देत नाही. किंबहुना सामान्य माणसाला माझी मदत मिळाल्यास त्यात मला खूप आनंद मिळतो. म्हणूनच आयुष्यात पैसे कमवण्यापेक्षा मी माणसं कमावली.

एखादी गोष्ट चांगली की वाईट हे मी माझ्या आंतरआत्म्याला विचारून ठरवतो. राजकारण समाजाच्या दैनंदिन गरजांशी निगडित आहे. ज्याची उंची मोठी असली पाहिजे. महात्मा गांधी,अटलबिहारी वाजपेयी तसेच नरेंद्र मोदी या माणसांनी ही उंची गाठली. समाजाच्या कल्याणासाठी अशी माणसे राजकारणात आली पाहिजेत.

मला निवडून देऊन लोकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे. लोकांची जास्तीत जास्त कामे करून हा जनतेचा विश्वास मी सार्थ ठरवीन असे ही खासदार बापट यावेळी म्हणाले.

माजी पोलीस उपमहासंचालक अशोक धिवरे म्हणाले, टेल्को ही एक संस्कृती आहे, या संस्कृती मुळेच टेल्को मध्ये काम करणारा एक सर्वसामान्य माणूस देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाऊन बसू शकला. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी देशाच्या सर्वोच्च सदनामध्ये ते प्रयत्न करतील हा माझा विश्वास आहे. सध्याच्या बदलत्या राजकारणात चांगल्या राजकारणाचा पोत टिकवून ठेवणारी त्यांच्या सारखी माणसे आवश्यक आहेत.

श्रीकृष्ण आंबर्डेकर यांनी गिरीश बापट यांनी केलेल्या कामामुळे ते चिरतरुण आहेत. त्यांच्या कामामुळे नवीन पिढीला ही प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त केली. ऑब्रे रिबेलो यांनी टेल्को मधील आपला एक मित्र, सहकारी सर्वोच्च पदावर गेला असल्याचा आनंद व्यक्त केला. इतक्या मोठ्या पदावर जाऊन ही ते आपल्या जुन्या सहकाऱ्यांना विसरत नाहीत याचा अभिमान असल्याचे सांगितले.

सुनील शिरोडकरांनी आपल्या प्रस्तविकामध्ये खासदार बापट यांच्या बद्दलच्या आठवणी सांगितल्या. टेल्को युनियनचे माजी पदाधिकारी अनिल उरटेकर यांनी ही यावेळी बापट यांचे अभिनंदन करून त्यांच्याकडे पुणेकरांच्या विकासाच्या अपेक्षा व्यक्त केल्या. स्वागत केशव जोशी यांनी केलं. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते दत्ताजीराव गायकवाड, प्रभाकर रेणावीकर, मकरंद तिखे, प्रमोद मायभाटे यांच्या सह टेल्को मधील निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.