औरंगाबाद :: कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जनतेने नेहमीप्रमाणेच सहकार्य करावे. गणेशोत्सव, ईद सण उत्साहात साजरा करतांनाच कायद्याचे पालन करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.

तापडीया नाट्य मंदिर सभागृहात पोलिस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव 2016 शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, इम्तियाज जलिल, उपमहापौर प्रमोद राठोड, महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, संदीप आटोळे, वसंत परदेशी, धर्मदाय सह आयुक्त श्रीकांत भोसले, उपायुक्त व्ही. आर. सोनवणे, माजी आमदार प्रदीप जयस्वाल, आंबादास दानवे, गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, किशोर कच्छवाह, संभाजी सोनवणे, दशरथ मुळे, पंजाबराव तौर पाटील, अभिजीत देशमुख, कार्यकारी अभियंता श्रीमती गाडेकर आदींसह सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, गणेश उत्सव काळात येणाऱ्या अडीअडचणींचे निरसण करण्यासाठी व योग्य तो समन्वय ठेवण्यासाठी शांतता समितीच्या सदस्यांनी पुढाकार घ्यावा. प्रशासनामार्फत योग्य ती कार्यवाही करुन उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. गणेश मंडळांना आवश्यक असणारी परवानगी एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दि. 29 ऑगस्टपासून एक खिडकी सुविधे अंतर्गत पोलिस आयुक्तालयाच्या अलंकार सभागृहामध्ये सकाळी 10 ते 2 पर्यंत अर्ज  स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे मंडळांना एकाच छताखाली तत्काळ परवानगी मिळणे सुलभ होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी गणेश उत्सव काळात दुकानदारांनी उघड्यावर मांस विक्री करु नये. गणेश मंडळांनी रस्त्यावर स्टॉल उभारतांना खड्डे करु नयेत. त्याचबरोबर परिसरातील घनकचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी असे सांगितले. शांतता व उत्साह पूर्ण वातावरणात उत्सव साजरा करावा, असे सांगून सणाच्या शुभेच्छा दिल्या.

आमदार संजय शिरसाट, अतुल सावे,  इम्तियाज जलील, प्रदीप जयस्वाल यांनी यावेळी पोलीस प्रशासनाला जनतेने सहकार्य करुन सण उत्साहात साजरा करावा असे विचार मांडले. बैठकीत नंदकुमार घोडेले, राजेश पवार, रतन साबळे, श्रीपत शिंदे, मंगला खिंवसरा यांनी सूचना मांडल्या.

सन 2015 मध्ये  सार्वजनिक गणेश मंडळांनी  उभारलेल्या देखाव्यांना मान्यवरांच्याहस्ते पारितोषीक देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सिडको विभागातून अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक सावता गणेश मंडळ चिकलठाणा, गणेश महासंघ नवीन औरंगाबाद, जय महाराष्ट्र गणेश महामंडळ, औरंगाबाद यांना शहर विभागातून न्यू शिवशक्ती गणेश मंडळ खडकेश्वर, यादगार गणेश मंडळ जाधवमंडी, संस्थान गणेश मंडळ राजाबजार, छावणी विभागातून बजाजनगरचा राजा मोहटादेवी, औरंगाबाद, पडेगावचा राजमंडळ (सैलानी)औरंगाबाद, विश्वास गणेश मंडळ, छावणी यांचा समावेश होता. तर सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून वाळूज एमआयडीसी येथील रांजणगावच्या संत सावता गणेश मंडळाला ढाल गणेश मूर्ती आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. सूत्रसंचालन नागनाथ कोडे यांनी केले. आभार पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांनी मानले. राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली.