कोथरूड, वारजे, डेक्कनमधील विस्कळीत वीजपुरवठा सुरळीत

पुणे, दि. 25 मार्च 2019 : महापारेषण कंपनीच्या 132 केव्ही फुरसुंगी-कोथरूड टॉवर लाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे कोथरूड, वारजे, डेक्कन परिसरात सोमवारी (दि. 25) दुपारी एक वाजता वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. सुमारे 35 हजार वीजग्राहकांना त्याचा फटका बसला. टॉवर लाईनच्या दुरुस्तीनंतर दुपारी 3.30 वाजता सर्वच परिसरातील वीजपुरवठा सुरळीत व पूर्ववत झाला.

याबाबत माहिती अशी, की महापारेषणच्या फुरसुंगी 220/132 केव्ही उपकेंद्रातून 132 केव्ही कोथरूड या टॉवर लाईनद्वारे कोथरूड येथील 132 केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो. अप्पर इंदिरानगर परिसरात या टॉवर लाईनखाली असलेल्या एका घराचा पत्रा इंडक्शन झोनमध्ये आल्याने टॉवर लाईनमध्ये स्पार्कींग होऊन वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे 132 केव्ही कोथरूड उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी महावितरणच्या कोथरूड विभाग अंतर्गत येणाऱ्या कोथरूड, वारजे, डेक्कन, एरंडवणे, लोकमान्यनगर, डहाणूकर कॉलनी, शिवणे, कर्वेनगर, आदित्य गार्डन, वारजे गावठाण आदी परिसरातील सुमारे 1 लाख 25 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी एकच्या सुमारास खंडित झाला होता.

महावितरणकडून तातडीने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात आले. यामध्ये महापारेषणच्या 132 केव्ही नांदेड सिटी व पर्वती या दोन उपकेंद्रातून महावितरणचे उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला व अर्ध्या तासात टप्प्याटप्प्याने सुमारे 90 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आला. मात्र उन्हामुळे विजेची मागणी वाढल्याने भार व्यवस्थापन शक्य झाले नाही. त्यामुळे सुमारे 35 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा सव्वादोन तास खंडित राहिला. दुपारी 3.20 वाजता महापारेषणकडून दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर 132 केव्ही कोथरूड उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरु झाला. त्यानंतर सर्वच परिसरात या उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा पूर्ववत व सुरळीत करण्यात आला.