गणेश मंडळांना तात्पुरत्या वीजजोडणीच्या सुरक्षा ठेवीची रक्कम ऑनलाईन मिळणार

बारामती, दि. 22 ऑगस्ट 2019 : सार्वजनिक गणेश मंडळांकडून तात्पुरत्या वीजजोडणी घेण्यात आलेल्या सुरक्षा ठेवीची रक्कम आॅनलाईनद्वारे संबंधीत मंडळांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.

 

महावितरणकडून गणेश मंडळांना प्राधान्याने वीजजोडणीसाठी देण्यात येत आहे. वीजभार ०.५ किव्होकरिता एक हजार रूपये वीजजोडणी खर्च आकारण्यात येईल. गणेश मंडळानी घेतलेल्या वीजभारानुसार सुरक्षा ठेव रक्कम आकारण्यात येईल. गणेश उत्सव संपल्यानंतर ही रक्कम संबंधीत मंडळाच्या बँक खात्यात ऑनलाईनद्वारे महावितरणकडून परत करण्यात येईल. गणेश मंडळाने सुरक्षिततेच्या जबाबदारीबाबत स्वत:चे प्रमाणपत्र (सेल्फ सर्टीफिकेशन), बँक खात्याची माहिती व मेाबाईल क्रमांक द्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

 

सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 27 पैसे अधिक 1 रुपया 28 पैसे वहन (व्हिलींग) आकार असे 4 रुपये 55 पैसे वीजदर आहेत. कितीही युनिट वीज वापरली तरी केवळ एकच वीजदर आकारण्यात येत असल्याने वापरलेल्या शेवटच्या युनिटपर्यंत केवळ 4 रुपये 55 पैसे दर आकारण्यात येणार आहे. त्याप्रमाणे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना सुद्धा सवलतीचा व वहन आकारासह 4 रुपये 55 पैसे प्रतियुनिट वीजदराने तात्पुरती वीजजोडणी देण्यात येत आहे. याआधी हा दर 5 रुपये 09 पैसे प्रतियुनिट असल्याचे बारामती परिमंडलकडून अनावधानाने कळविण्यात आले होते. मात्र गणेशोत्सवासह सर्वधर्मीय सार्वजनिक उत्सवासाठी 4 रुपये 55 पैसे प्रतियुनिट असा वीजदर असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.