ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो.बं.देगलूरकर  यांना २०१९  चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

पुणे:
‘ पुण्यभूषण फाऊंडेशन’(त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा ‘ पुण्यभूषण पुरस्कार’ २०१९ ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो.बं.देगलूरकर यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार पुरातत्वशास्त्र क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी देण्यात येत आहे, अशी माहिती ‘ पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली.
एक लाख रूपये रोख आणि सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरित असलेली बालशिवाजींची प्रतिमा, पुण्याच्या ग्राम देवतांसह असलेल्या या वैशिष्ठपूर्ण स्मृतिचिन्हाने या वर्षीच्या पुण्यभूषण पुरस्कारार्थीना गौरविण्यात येणार आहे.
पुरस्काराचे यंदाचे ३१ वे वर्ष आहे. या पुरस्काराबरोबर सीमेवर लढताना जखमी झालेल्या ५ सैनिकांना आणि एका वीरमातेलाही गौरविण्यात येणार आहे. यात वीरमाता लता नायर ,रायफल मॅन थानसिंग ,ग्रेनेड मॅन बलबीर सिंग ,नाईक फुलसिंग ,हवालदार प्रमोद सपकाळ ,हवालदार गोविंद बिरादार यांचा समावेश आहे .
पुण्यभूषण पुरस्कारार्थींचे नाव पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने निश्चित केले .
लवकरच हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.भगतसिंग ,सुखदेव ,राजगुरू यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी या पुरस्काराची घोषणा केली जाते . या तीन हुतात्म्यांची प्रेरणा समोर ठेवून ‘त्रिदल ‘ पुणे संस्थेची स्थापना झाली . या संस्थेने हा पुरस्कार सुरु केला .
————————
पुण्यभूषण पुरस्कार इतिहास
यापूर्वी ज्येष्ठ गायक पं.भीमसेन जोशी, राजा दिनकर संग्रहालयाचे कै. काका केळकर, शंतनुराव किर्लोस्कर, डॉ. बानुबाई कोयाजी, सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, योगाचार्य बी. के. एस.अय्यंगार, डॉ. रा. ना. दांडेकर, डॉ. मोहन धारिया, डॉ. जयंत नारळीकर, प्रतापराव उर्फ तात्या गोडसे, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदु बोर्डे, कै. जयंतराव टिळक, डॉ. जब्बार पटेल, श्री. राहुलकुमार बजाज, डॉ. के. बी. ग्रँट, विख्यात नृत्यसाधिका डॉ. रोहिणी भाटे, डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, विख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. रा. चिं.ढेरे, डॉ. ह. वि. सरदेसाई, श्रीमती निर्मलाताई पुरंदरे, श्री. सुधीर गाडगीळ, डॉ. सायरस पूनावाला, श्री. प्रतापराव पवार, श्री. भाई वैद्य आणि डॉ. के. एच. संचेती ,गेल्या वर्षी डॉ प्रभा अत्रे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
तत्कालीन राष्ट्रपती श्री. प्रणब मुखर्जी, माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम, उपराष्ट्रपती मा. श्री.हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी सभापती श्री.सोमनाथ चटर्जी, श्री. मनोहर जोशी, श्री. शरद पवार, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटपटू कपिलदेव व सचिन तेंडूलकर, परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार, वसंतराव साठे, कै. नानासाहेब गोरे, तत्कालीन राज्यपाल सी.सुब्रह्मण्यम्, कै. मधु दंडवते, दि हिंदू चे संस्थापक-संपादक एन.राम, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, श्री. सुशिलकुमार शिंदे, सी.पी.आय.(एम)जनरल सेक्रेटरी मा.श्री.सिताराम येचुरी, नाट्यदिग्दर्शक श्री.गिरीश कर्नाड, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.एस.एल.भैरप्पा, प्रसिद्ध नाटककार श्री. महेश एलकुंचवार, मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण, डॉ. विकास आमटे, आशा भोसले, श्री. नारायणमूर्ती, श्री. शरद यादव, केंद्रिय मंत्री श्री. नितीन गडकरी ,हरिप्रसाद चौरासिया ,अमजद अली खान ,शिवकुमार शर्मा आदि मान्यवरांनी पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करून नामांकित पुणेकरांचा सन्मान केला आहे.