नरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक ‘ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध 

पुणे : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहितेला डावलून प्रदर्शित होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील ‘पीएम नरेंद्र मोदी ‘ या बायोपिकला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाने तीव्र विरोध दर्शविला आहे . पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि थिएटर असोसिएशनला शुक्रवारी यासंदर्भात निवेदन देण्यात आले .
राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य -कला –सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी आज पुण्यात पत्रकाद्वारे ही महिती दिली .
‘हा बायोपिक म्हणजे मतदारांना प्रभावित करण्याचा हा प्रयत्न असून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग या चित्रपटाने होत असल्याची तक्रार आम्ही प्रशासनाकडे केली . तसेच हा चित्रपट प्रदर्शित करू नये असा इशाराही चित्रपट गृहांना दिला .तरीही हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झाल्यास होणाऱ्या उद्रेकाची जबाबदारी निर्माते ,वितरक ,प्रशासन आणि चित्रपट गृह मालकांची राहील ‘असे बाबासाहेब पाटील यांनी या पत्रकात म्हटले आहे .
विवेक ओबेरॉय ची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात प्रदर्शित होत असून त्याचा ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे . हा उघड -उघड निवडणूक प्रचाराचा प्रयत्न असून त्याचा खर्च भाजपच्या प्रचारात धरणार का ? असा सवालही बाबासाहेब पाटील यांनी केला आहे.निवडणूक आयोग या चित्रपट प्रदर्शनाच्या बाबतीत मूग गिळून गप्प बसला असला तरी आम्ही त्यांना जागे करू ,असेही त्यांनी म्हटले आहे .