नामवंताच्या कार्याला उर्जा देण्याची परंपरा : अशोक चव्हाण

पुणे : भारताचे माजी गृहमंत्री तथा मराठवाड्याचे भगीरथ डॉ. शंकररावजी चव्हाण यांनी माणूस हा केंद्रबिंदू ठेऊन विकासाची कामे केली. त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार देशातील नामवंत व्यक्तीच्या कार्याला उर्जा देणारा असल्याने ही परंपरा कायम ठेवावी,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.

मीमांसा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, समीक्षा, ह्यूमन राईटस फाऊंडेशन व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्या वतीने दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दिला जाणारा ‘डॉ. शंकरराव चव्हाण गुरूरत्न पुरस्कार’ पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांना अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार विद्याताई चव्हाण, बायोशुगरचे चेअरमन नरेंद्र चव्हाण, नांदेडच्या महापौर दिक्षा धबाले, हार्दिक पटेल, पद्मजा सिटीचे संचालक बालाजीराव जाधव, लातूरचे विजयकुमार यादव आदी उपस्थित होते. डॉ. चोरडिया यांच्यासोबतच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानसीक रोग्यांवर उपचार करण्याचे कठीण काम करणारे डॉ. नितीन दलाया यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित आणि गुणवत्तेचे शिक्षण देऊन एक चांगला भारतीय नागरिक घडविण्यासाठी आम्ही काम करत आहोत.”

दिलीपराव देशमुख म्हणाले, “डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे नांदेडसह परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. एवढ्या उंचीचा नेता पुन्हा होणे शक्य नाही. नरेंद्र चव्हाण, ज्येष्ठ गायक नंदेश उमप, हभप शालीनीताई देशमुख इंदोरीकर, विद्याताई चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी जाधव यांनी केले. सुत्रसंचलन संतोष देवराये यांनी केले, तर संपादक रूपेश पाडमुख यांनी आभार मानले.