नृत्यातील पुण्याचे काम देशभर पोहोचण्यासाठी संस्थात्मक काम गरजेचे : शमा भाटे

२७ अप्रैल २०१९, पुणे ः

‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘कथक मधील नृत्य संरचनांचा प्रवास'(कोरिओग्राफी -काल,आज ,उद्या)या विषयावर ज्येष्ठ नृत्य गुरु शमा भाटे यांच्या मुलाखतीला आज (शुक्रवारी )चांगला प्रतिसाद मिळाला.
‘शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था’ यांनी हा कार्यक्रम सादर केला .शमा भाटे यांची मुलाखत जयश्री बोकील आणि लीना केतकर यांनी घेतली.
दि. २६एप्रिल, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ‘भारतीय विद्या भवना’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे हा कार्यक्रम झाला.
‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत हा ७५वा कार्यक्रम होता.
शमा भाटे म्हणाल्या, ‘कोरियोग्राफी हे पाश्चात्त्य तंत्र आहे.उदय शंकर यांनी हे क्षेत्र भारतीयांसाठी खुले केले.तेव्हा कोरियाग्राफी शब्द नव्हता, बॅले शब्द होता.आपल्या नृत्यशैलींचे पुनरूत्थान व्हावे, यासाठी त्या काळातील गुरु प्रयत्नशील होते.डान्स डिरेक्टर ते कोरियोग्राफर असा शब्दाचा प्रवास आहे. नृत्य संरचना असेही त्या काळात कोणी म्हणत नव्हते.
नृत्य क्षेत्रातील पुण्याचे नाव देशभर व्हावे, यासाठी आम्ही संस्थात्मक काम सुरू केले आहे.नृत्य हे एका वर्गासाठी मर्यादित नाही. ते सर्वांसाठी आहे. सर्वांना ते आवडते.
पुण्यात भरतनाट्यम, कथक प्रचलित होते. कुचीपुडी, अरंगेत्रम तितके प्रचलित नव्हते.
पौराणिक रचनांपासून भारतात नृत्य संरचनांना सुरवात झाली, भारतीय रचनांचे पुनरुत्थान करावे, असे तेव्हा भारतीय गुरुंना वाटत होते. नंतर सामाजिक रचनाही भारतीय नृत्यात येत गेल्या. आता डान्स स्क्रिप्टही लिहिली जाते.
‘ आपण ज्या नृत्यशैलीत वर्षानुवर्षे वावरतो, त्याच शैलीचा विचार मन करीत असते. कथकच्या बाबतीत माझे तसेच झाले आहे. माझे मन कथक झाले आहे.
नृत्यरचनांना त्यातील सांस्कृतिक आशयाप्रमाणे संगीत देण्याचा प्रयत्न मी करते.पूर्वी नेटवर संगीतरचना शोधता येत नसत. आता ती सुविधा आहे.
संगीत हे केवळ नृत्याची पार्श्वभूमी तयार करीत नाही, तर ते नृत्याचा विचार घेऊन येते. संगीत ह्रदयापर्यंत पोहोचले पाहिजे.
लय _ ताल विचार हा नृत्य संरचना करताना महत्वाचा असतो. गुरुंकडून तेही आम्ही शिकलो, असेही शमा भाटे यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितले. वाचन ही महत्वाचे असते. आणि डोळयांनी पाहणेही नृत्याला उपयोगी ठरते, असेही शमा भाटे यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितले.
‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.