पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांची आता सांस्कृतिक क्षेत्रातही घौडदौड

पिंपरी (दि. 19 एप्रिल 2018) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकृर्डीतील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही यशस्वी घौडदौड सुरु आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने 19 वी राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात संपन्न झाली. यामध्ये राम गणेश गडकरी एकांकिका स्पर्धा करंडक मध्ये पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘एंट्री एक्झिट’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला आणि उत्कृष्ट अभिनय व दिग्दर्शक अथर्व ठाकरे, उत्कृष्ट संगीत विभाग व्दितीय क्रमांक वेदांत सेलमोकर, श्रध्दा टिल्लू, उत्कृष्ट नेपथ्य सुयश साळवेकर, अभिषेक बिल्दीकर यांनी चार वैयक्तिक बक्षिसे मिळवून पीसीसीओईचे नावात मानाचा तुरा रोवला.तसेच महाविद्यालयीन नाट्य स्पर्धेत आकर्षण असणा-या पुरुषोत्तम करंडक आणि फिरोदिया करंडक स्पर्धेत देखील पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांनी दोन पारितोषिके मिळविली. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत 14 विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘माझ्या छत्रीचा पाऊस’ या एकांकिकेने प्रेक्षकांवर वेगळा ठसा उमटविला. तसेच मराठी राज्य नाट्य स्पर्धेत अथर्व ठाकरे याने पिंपरी चिंचवड विभागातून अभिनयाचे प्रथम पारितोषिक पटकाविले. संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेत वेदांत सेलमोकर, चैतन्य शेंबेकर, चाणक्य तेंडुलकर, राहुल देसाई या विद्यार्थ्यांनी संगीत विभागात प्रथम क्रमांक मिळविला आणि शुभम अलई याला स्वलिखीत कवीता रेडीओवर सादर करण्याची संधी मिळाली.पीसीसीओईमधील आर्ट सर्कलच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्राबरोबरच आता सांस्कृतिक, कला क्षेत्रात देखील स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. अ.म.फुलंबरकर यांनी आर्ट सर्कलचे मार्गदर्शक प्रा. अतुल पवार व या विद्यार्थ्यांचा बुधवारी गौरव केला. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस.काळभोर, कोषाध्यक्ष शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक गिरीष देसाई, विद्यार्थ्यी कल्याण विभागाच्या अधिष्ठाता प्रा.डॉ. शितल भंडारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.