पेट्रोल चोरी प्रकरणी राज्यातील ८ पेट्रोल पंपांची डिलरशीप रद्द

नागपूर : राज्यात पेट्रोल व डिझेल डिस्पेन्सींग युनिटमध्ये अफरातफर करुन पेट्रोल व डिझेल चोरी करण्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. याबाबत उपाय योजना करण्यासाठी राज्यात आत्तापर्यंत १८६ पेट्रोल पंप तपासले असून या तपासणीत सदोष आढळणाऱ्या ८ वितरकांच्या पंपाची मान्यता पेट्रोल कंपन्यांनी रद्द केली आहे. अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी विधानसभेत दिली.

विधानपरिषद सदस्य संजय दत्त यांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल चोरी रोखण्याबाबत राज्य सरकार कडून काय उपाय योजना आखल्या जात आहेत याबाबत विधानपरिषदेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री बापट म्हणाले,

राज्यात १ सप्टेंबर २०१७ पासून पेट्रोल व डिझेल चोरी रोखण्यासाठी आणि वितरण व्यवस्था पारदर्शक,कार्यक्षम व्हावी यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. पेट्रोल डिझेल वितरणात पारदर्शकता यावी यासाठी पेट्रोल पंपावर काचेचे माप ठेवणे बंधनकारक ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक पेट्रोल पंपावरील डिस्पेंन्सिंग युनिटशी संबंधित सॉप्टवेअर व हॉर्डवेअरची तपासणी तसेच त्याचे ऑडिट करण्यात येत आहे. या ऑडिट रिपोर्ट मध्ये डिस्पेनसिंग युनिटचे हार्डवेअर/ सॉफ्टवेअर अशी संपूर्ण माहिती समाविष्ट केली आहे. या रिपोर्टवर पेट्रोलियम कंपनीचे प्रतिनिधी व डिस्पेनसिंग युनिट उत्पादन करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी व पंप चालवणारे मालक/ चालक यांचे प्रतिनिधी यांची स्वाक्षरी घेऊन त्यांना जबाबदार धरण्यात येत आहे.अशी उपाय योजना करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

आतापर्यंत राज्यातील १८६ पेट्रोल पंप तपासले असून त्यातील ९८ पेट्रोल पंपांच्या डिस्पेंसिंग युनिट मध्ये अफरातफर केल्याचे पोलीस तपासणीत निष्पन्न झाले आहे. या ९८ पैकी ५९ पंप प्रयोगशाळा तपासणी नंतर सदोष आढळलले आहे. पेट्रोल पंप सदोष आढळल्याने ८ पेट्रोल पंपांची मान्यता पेट्रोलियम कंपन्यांकडून रद्द करण्यात आली आहे. याप्रकरणी ३३ जणांना अटक करण्यात आले आहे. या प्रकरणी सरकारच्या वतीने ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया श्री.अनिल सिंग न्यायालयात बाजू मांडत आहेत. अशी माहिती श्री बापट यांनी दिली आहे.