प्रत्येक माणसाला अभिमान वाटावा असे शिवछत्रपती स्मारक – हरिभाऊ बागडे

औरंगाबाद दि.22(जिमाका)—-मुंबई येथे अरबी समुद्रात शिवछत्रपती  स्मारक उभारले जात असल्याने प्रत्येक माणसाला अभिमान वाटावा असा क्षण आला आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले आहे.

औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी येथे आयोजित शिवछत्रपती स्मारक रॅली प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार नारायण कुचे, महापौर बापूजी घडामोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवछत्रपती स्मारक अरबी समुद्रात उभारण्याचा मनोदय गेली वीस वर्ष प्रलंबित होता माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळात ही संकल्पना पुढे आली होती पण नंतरच्या काळात या स्मारकाच्या उभारणीत प्रयत्न अपूर्ण पडले मात्र आता केंद्राच्या 12 सर्व नाहरकत परवानग्या मिळवून हे काम मार्गी लागत आहे असे सांगून अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की राज्यातील गड, किल्ले येथील माती तसेच पवित्र नदयांचे पाणी संकलीत करून स्मारकाला अर्पण करण्यात येत आहे. वेरूळ येथील शहाजी राजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गढीची मातीदेखील स्मारकाकडे नेली जात आहे.

महापौर बापू घडामोडे, आ. नारायण कुचे यांनीही शिवछत्रपती स्मारकाप्रती भावना व्यक्त केल्या. मुकूंदवाडी येथील नगरसेविका कमलताई नरोटे, माजी मंत्री डॉ. नामदेव गाडेकर, माजी उपमहापौर राजू शिंदे, श्रीराम पाटील शेळके, दामू अण्णा नवपूते, मधूकर नवपूते, गोपीनाथ वाघ आदींची यावेळी उपस्थिती होती.  रामचंद्र नरोटे यांनी आभार मानले.