‘बांधकाम परवानगीस तात्पुरती बंदी‘ हा तुघलकी निर्णय – सचिन साठे

पिंपरी (दि. 14 जून 2018) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चिंचवड विधानसभा मतदार संघातील ठराविकच भागातील नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये असा निर्णय घेण्यात आला. पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, ताथवडे, रावेत, वाकड, पुनावळे, मामुर्डी, किवळे भागातील नवीन गृहप्रकल्पांना आगामी चार महिने बांधकाम परवाना देण्यात येणार नाही. हा तुघलकी निर्णय असल्याची टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केली आहे.

केंद्रात राज्यात व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस देशात व राज्यात औद्योगिक गुंतवणूक वाढवून रोजगार वाढवू असे आश्वासन देतात. यातून शहराचा व राज्याचा विकास होईल अशी स्वप्ने नागरिकांना त्यांनी दाखविली आहेत. तर याच्या उलट पिंपरी चिंचवड मनपातील प्रशासन निर्णय घेऊन विकासालाच खिळ घालत असल्याचे परस्पर विरोधी चित्र शहरातील नागरिकांना पहायला मिळत आहे. हा निर्णय म्हणजे ‘आग रामेश्वरी, अन बंब सोमेश्वरी’ असा आहे. पाण्याचे कारण सांगून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. चोविसतास शहराला मुबलक पाणी पुरवठा करु. या निवडणूकीपुर्वी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले? मागील चार वर्षात औद्योगिक गुंतवणूक वाढून विकास झाला असेल तर रोजगारासाठी शहरात आलेल्या नागरिकांच्या निवासाच्या प्रश्नांचे काय? धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही, चालूवर्षी एकशे दोन टक्के पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे तरी पाण्याचा प्रश्न चिंचवड विधानसभा मतदार संघातील ठराविक भागांपुरताच आहे काय? सभावृत्तांत कायम होण्याची वाट न पाहता ठरावा प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असे आदेश देण्याची घाई कशासाठी? भाजप पदाधिका-यांच्या दबावाखाली काम करणा-या प्रशासनाच्या ढिसाळ कामकाजामुळे संपुर्ण शहरातीलच पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याकडे दुर्लक्ष करुन राजकीय विरोधकांना व ठराविक बांधकाम व्यावसायीकांना विरोध करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे काय? या प्रश्नांची उत्तरे नागरिकांना मिळाली पाहिजेत असे साठे यांनी या पत्रकात म्हटले आहे.
———————–