बारामती लोकसभा मतदार संघातील पाणी प्रश्न सोडवा

पुणे, दि. १० (प्रतिनिधी) – बारामती लोकसभा मतदार संघातील वेगवेगळ्या गावांत सध्या सुरु असलेले पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि विद्यमान पाणी योजना, तलाव, धरणांतील उपलब्ध पाणी साठा आणि विंधन विहिरींचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्यासोबत बैठक घेऊन सुळे यांनी याबाबत सविस्तर तोडगा काढण्याच्या सूचना केल्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दौंड तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, इंदापूर शहराध्यक्ष अनिल राऊत, खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबक मोकाशी यांच्यासह पुरंदर, बारामती, मुळशी, भोर विधानसभा मतदार संघातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते. पुरंदर तालुक्यातील नाझरे प्रकल्पावर सध्या ५० गावे, जेजुरी एमआयडीसी तसेच इंडिअन सीमलेस कंपनी व धरणातील उपसा जलसिंचन योजनेच्या सुमारे १००० विद्युत मोटारी आहेत. परिणामी लाभक्षेत्राच्या शेतीला पाणी मिळत नाही. म्हणून पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी इतर शेतकऱ्यांच्या दराने या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणी यावेळी प्रामुख्याने करण्यात आली. याशिवाय जनाई योजनेचे पाणी दौंड तालुक्यातील काही गावांना, शिरसाई योजनेतून काही पाणी आसपासच्या काही गावांतील छोट्या छोट्या तलावांत सोडणे आवश्यक असल्याचे यावेळी पाटबंधारे विभागाच्या लक्षात आणून देण्यात आले.
मळद, कुरकुंभ, जिरेगाव, कौठडी शिवेवरील तलावात पावसाळ्यामध्ये एका वेळेस पाणी सोडल्यास प्रामुख्याने मळद, कुरकुंभ, जिरेगाव, कौठडी या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा आणि पशुधनासाठी आवश्यक पाण्याचा प्रश्न कायमचा मिटू शकतो, असे यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितले. याशिवाय मतदार संघातील अनेक गावांत राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत कामे मंजूर झाली असून निधीही मिळाला आहे. तरी लवकरात लवकर ती कामे पूर्ण होऊन त्या त्या गावांतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
चौकट
*नीरा डाव्या कालव्याचे पाणी बंद नळातून न्यावे*
भोर तालुक्यातील निरा देवघर प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे पाणी बंद पाईपलाईनमधून नेण्याबाबत सर्व्हे अद्याप झाला नाही. या प्रकल्पाचे तातडीने सर्व्हेक्षण होऊन त्यानुसार कार्यवाही झाल्यास पाण्याची बचत होणार आहे. त्यामुळे मूळ प्रकल्पामध्ये समाविष्ट नसलेल्या म्हसर खुर्द, म्हसर बुद्रुक, करंजगाव, गोळेवाडी, निगुडघर, आपटी, नांदगाव, वाठारहिमा, पिसावरे, महुडे बुद्रुक, भानुसदरा, महुडे खुर्द, माळवाडी, ब्राम्हणघर हिमा या गावांचा समावेश व्हावा. तसेच या गावांच्या वरच्या डोंगराकडील बाजूने कालव्याची पाईपलाईन गेल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली. भोरचे जिल्हा परिषद सदस्य रणजीत शिवतरे यांनी ही बाब लक्षात आणून दिली.