शेंद्रा औद्योगिक वसाहतीत औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाऊनशीप लिमिटेडच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली . याप्रसंगी राज्य विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योग तथा खनिकर्म मंत्री सुभाष देसाई, सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, महाराष्ट्र राज्य रोजगार हमी समिती अध्यक्ष प्रशांत बंब, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार रावसाहेब दानवे, आमदार सुभाष झांबड, आमदार संजय शिरसाट, आमदार अतुल सावे, प्रधान सचिव (उद्योग) अपूर्व चंद्रा, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शेठी, व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार, सहव्यवस्थापकीय संचालक गजानन पाटील, प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

वॉक टू वर्क या संकल्पनेतून हे नवीन औद्योगिक शहर निर्माण केले जात आहे. यासाठी विशेष हेतू कंपनी (एसपीव्ही) स्थापन केली असून या शहराचे ‘ऑरीक’ असे ब्रॅडिंग करण्यात आले आहे. उद्योग व्यवसायासोबतच या स्मार्ट सिटीत रहिवासी क्षेत्र तसेच शाळा, इस्पितळ, उद्यान, पोलिस स्टेशन इत्यादी सार्वजनिक सुविधासुद्धा विकसित करण्यात येणार आहेत, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले की, रस्ते, पॉवर केबल, ट्रॉर्म वॉटर ड्रेन इत्यादी पायाभूत सुविधांचे काम मार्च 2016 पासून सुरु झाले आहे. हे काम ऑक्टोबर 2018 पर्यंत पूर्ण केले जाईल. एकूण दहा हजार एकर पैकी 9500 भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शेंद्रा औद्योगिक वसाहतीचे नऊ चौरस किलोमिटर मधील काम दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. बिडकीन औद्योगिक वसाहतीचे 31 चौ.कि.मी. चे काम 2017 मध्ये सुरु होईल आणि ते 2022 सालापर्यंत पूर्ण केले जाईल.

केंद्र सरकारने यासाठी आठ हजार कोटीच्या पायाभूत आराखड्यास मंजुरी दिली असून त्यापैकी 600 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत तर तीन हजार कोटी रुपये डीएमआयसी ट्रस्टनेही मंजूर केले आहेत. हे क्षेत्र पाणीटंचाईला तोंड देणारे असल्याने येथे 50 टक्के पाणी जायकवाडी प्रकल्पातून घेतले जाईल व 50 टक्के पाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करुन उद्योगधंद्याना पुरवले जाईल. उद्योग कारखान्यातील टाकाऊ पाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर केला जाईल. येथे असा वॉटर टँक बांधण्यात येईल जो की या स्मार्ट सिटीला तीन दिवस पाणीपुरवठा करु शकेल. त्यामुळे उद्योगासाठी लागणारा पाण्याचा अडथळा दूर होईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

या ‘ऑरीक’ सिटीत मे. हयात हॉटेल, प्रीमियम ट्रान्समिशन कंपनी, देलारु (यु.के.) सेक्युरिटी प्रिटींग कंपनी, कोव्हेमी (इटली) ॲटो फिल्म्स कंपनी या कंपन्यांशी गुंतवणूक करार झाला असून यामुळे जवळपास 600 कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे. यामुळे 750 लोकांना रोजगार मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

‘ऑरीक’ सिटी विकसित व्हावी म्हणून राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण केले जाणार आहे. येथील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी राज्य शासनातर्फे निधी उपलब्ध करुन दिला आहे आणि ते काम लवकरच सुरु केले जाणार आहे, असे सांगून ही स्मार्ट सिटी आयसीटी स्मार्ट सिटी होणार आहेत. सर्व युटिलिटीज (वीज, पाणी, दळणवळण इत्यादी सुविधा) अंडरग्राउंड होणार आहे. अशाप्रकारचे क्षेत्र हे भारतात प्रथमच होत आहे. या सर्व सुविधांचे नियंत्रण व निरिक्षण एका कमांडवर होणार असून ते  सेंट्रल कंट्रोल रुममार्फत हाताळले जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. दरम्यान ‘ऑरीक’ प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेंद्रा औद्योगिक वसाहतीत मोटार वाहनाने फेर फटका मारुन सुरु असलेल्या प्रगतीपर कामाची पाहणी केली.

नोटा बदलामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये

  • मुख्यमंत्री

       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नागरिकांनी घाबरु नये. कायदेशीरपणे कमावलेला पैसा सुरक्षित राहणार आहे. नोटा बँकेत जमा करता येतील. चेकचे व डेबिट, क्रेडिट कार्ड चे व्यवहार सुरक्षित राहणार आहेत व एटीएम द्वारे लोकांना पैसे काढता येतील. रस्त्यांच्या टोलवरील अडचणी दूर केल्या जात आहेत. या नोटा बदलण्याच्या निर्णयामुळे देशाची प्रगती तीन पटीने होणार आहे, असे सांगून त्यांनी या निर्णयामुळे देशाला लागलेल्या काळ्या पैशाचा कॅन्सर दूर होईल. 20 हजार रुपयापर्यंतचा आर्थिक व्यवहार कॅशने करण्यास परवानगी असल्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. ज्यांची मेहनतीची कमाई आहे त्यांचा आज बोलबाला होईल तर काळ्या धनाच्या कमाईवाल्याचे तोंड काळे होईल, असेही ते म्हणाले.