महापारेषणच्या उपकेंद्रात बिघाड; पुणे शहरातील अडीच लाख ग्राहकांची वीज दोन तास खंडित

पुणे, दि. 13 जून 2019 : महापारेषण कंपनीच्या 220 केव्ही पर्वती अतिउच्चदाब उपकेंद्रांमधील तांत्रिक बिघाडामुळे पुणे शहरातील सुमारे अडीच लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा बुधवारी (दि. 12) मध्यरात्रीनंतर दोन तास खंडित होता तर सुमारे 50 हजार वीजग्राहकांना महावितरणकडून पर्यायी व्यवस्थेतून तात्काळ वीजपुरवठा करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या 220 केव्ही पर्वती उपकेंद्रातील पोटॅन्शियल ट्रान्सफॉर्मर (पीटी)मध्ये बुधवारी (दि. 12) मध्यरात्रीनंतर 1.23 वाजता बिघाड झाला व तो फुटला. पर्वती उपकेंद्रातून 132 केव्ही रास्तापेठ जीआयएस उपकेंद्राला वीजपुरवठा होतो. परंतु या बिघाडामुळे पर्वतीसोबतच रास्तापेठ उपकेंद्राचाही वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे महावितरणच्या पर्वती, बंडगार्डन, पद्मावती व रास्तापेठ विभाग अंतर्गत पुणे शहराच्या मध्यवस्तीमधील रास्तापेठ, कसबा पेठ, भवानी पेठ, रविवार पेठ, सदाशिव पेठ, बुधवार पेठ, गंज पेठ आदी सर्व पेठा तसेच लक्ष्मी रोड, गुलटेकडी, लुल्लानगर, कॅम्प, मंडईचा काही भाग, हाईडपार्क, स्वारगेट, मार्केट यार्ड, शंकरसेठ रोड, सिंहगड रोड, वडगाव धायरी, सेंट मेरी आदी परिसरातील सुमारे 3 लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुद्धा खंडित झाला होता. त्यामधील सुमारे 50 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा मध्यरात्री दीडपर्यंत महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रयत्न करून पर्यायी व्यवस्थेतून उपलब्ध करून दिला.

महापारेषणकडून 220 केव्ही पर्वती उपकेंद्रातीलतील नादुरुस्त पोटॅन्शियल ट्रान्सफॉर्मरवरील वीजभार त्याच ठिकाणी अतिरिक्त स्वरुपात असलेल्या दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरवर घेण्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले. मात्र त्यात काही तांत्रिक अडचणी आल्याने दोन तासांचा कालावधी लागला. काम पूर्ण झाल्यानंतर 220 केव्ही पर्वती व 132 केव्ही रास्तापेठ उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला. त्यानंतर बंद असलेले 13 उपकेंद्र व 34 वीजवाहिन्यांवरील 2 लाख 50 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पहाटे 3.15 वाजेपर्यंत महावितरणकडून पूर्ववत करण्यात आला.