महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल, दुरुस्तीचे कामे पुर्णत्वाकडे

पुणे, दि. 28 मे 2019 : महावितरणकडून पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात सुरु असलेल्या वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे आहेत. येत्या पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून ही कामे करण्यात येत आहेत.

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणकडून दरवर्षी देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जातात. यात प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या लहान फांद्या तोडून टाकणे, तुटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, ऑईल फिल्टरेशन, उपकेंद्गातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जींग, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीज खांब, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे अशा विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे. रोहित्र तसेच वीजयंत्रणेच्या ठिकाणी नागरिकांनी टाकलेला कचराही या मोहिमेत साफ करण्यात येत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून भर उन्हात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी देखभाल व दुरुस्तीच्या कामांना वेग दिला आहे. यामध्ये विविध ठिकाणी झाडांच्या छोट्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. तर धोकादायक असलेल्या मोठ्या फांद्यांबाबत संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थांना माहिती देण्यात आली आहे. याशिवाय सुमारे एक हजार डिस्क व पीन इन्सूलेटर बदलण्यात आले आहेत. उन्हात तापलेल्या अवस्थेत असलेल्या डिस्क व पीन इन्सूलेटरवर पावसाच्या पाण्याचे थेंब पडल्यास त्याला किंचितशी भेग पडली तरी वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे खराब झालेले हे दोन्ही इन्सूलेटर बदलण्यात येत आहेत. तसेच 559 फिडर पिलरची दुरुस्ती करण्यात आली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात फिडर पिलरच्या ठिकाणी नवीन 76 रिंग मेन युनिट लावण्याचे काम पूर्ण झाले आहे.

खासगी किंवा संस्थांच्या मालकीच्या जागेतील झाडे किंवा मोठ्या लांबीच्या फांद्या वादळी व मुसळधार पावसामुळे वीजवाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असते. या शक्यतेचा अंदाज घेऊन संभाव्य धोका निर्माण करणार्‍या झाडांची किंवा मोठ्या फांद्यांची संबंधीतांनी महानगरपालिकेची परवानगी घेऊन कटाई करावी. त्यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन महावितरणने केले आहे.

चौकट – महावितरणचे कॉल सेंटर 24 तास उपलब्ध – शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे कॉल सेंटर 24 तास उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदविण्यासाठी 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 किंवा 1912 या तीन टोल फ्री क्रमांकावर कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे वीजग्राहकांना संपर्क करण्याची व वीजसेवेविषयक कोणत्याही प्रकारची तक्रार व माहिती देण्याची सोय उपलब्ध आहे.