रक्ताचा तुटवडा असताना सरकारी रुग्णालयांना महावितरणचा आधार; आरोग्य विभागाकडून कौतुक

बारामती, दि. 18 नोव्हेंबर 2019: रक्ताचा तुटवडा असण्याच्या कालावधीत महावितरणच्या राज्यव्यापी रक्तदान शिबिरामुळे एकाच दिवशी राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील गरजू रुग्णांसाठी सुमारे सहा हजार बाॅटल्स रक्त उपलब्ध झाले. या उपक्रमाचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डाॅ. प्रदीप व्यास यांनी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांना पत्र पाठवून कौतुक केले आहे व रक्तदात्यांचे आभार मानले आहेत.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये एकाच दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास मोठा प्रतिसाद देत व सामाजिक बांधिलकी जोपासत महावितरणच्या सुमारे 6 हजार कर्मचाऱ्यांनी दि. ११ आँक्टोबरला रक्तदानाचे महादान केले होते. यात सर्वाधिक बारामती परिमंडलमधील 805 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले होते.

या रक्तदान शिबिराच्या उपक्रमाबद्दल महावितरणचे व रक्तदात्यांचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डाँ. प्रदीप व्यास यांनी भरभरून कौतुक केले आहे. साधारणतः आँक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने नियमित रक्तदाते उपलब्ध नसल्यामुळे रक्ताचा मोठा तुटवडा भासतो. अशावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यातील धार्मिक आणि सामाजिक संस्था तसेच कार्पोरेट हाऊसेसच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्ताचा तुटवडा भरून काढण्याचे प्रयत्न करण्यात येतात. मात्र यंदा आँक्टोबरमध्ये महावितरणने एकाच दिवशी रक्तदान शिबिरातून 6 हजार रक्ताच्या बाँटल्स शासकीय रुग्णालयांतील गोरगरीब रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत व अत्यंत गरजेच्या वेळी रुग्णांना या रक्तदान शिबिरामुळे महावितरणकडून आधार मिळाला आहे.