रसिक मित्र मंडळ च्या ईद मिलन मुशायरा ला चांगला प्रतिसाद

पुणे : उर्दू, हिंदी, मराठी, गुजराती या मधूर  भाषाभगिनींना ईदचे औचित्य साधून शिरखुर्म्याच्या खुमारीसह एकत्र करणाऱ्या ‘ रसिक मित्र मंडळ ‘ च्या ‘ ईद मिलन मुशायरा ‘ कार्यक्रमाला सोमवारी सायंकाळी चांगला  प्रतिसाद मिळाला !
पत्रकार भवनच्या सभागृहात सोमवारी सायंकाळी ६ वाजता या निमंत्रित कवींच्या मुशायराचे आयोजन करण्यात आले होते.
एस.एस. राही,रहिमा पटेल, सीमा शर्मा, शायर इसामुद्दीन शोला, हेमंत सीमंत, हेमंत पुणेकर , हरिवल्लभ शर्मा,  सुधीर कुबेर , शमसाद टाकेदार, मुमताझ पीरभॉय, रफिक काझी, नझीर फतेहपुरी ,प्रदीप निफाडकर यांनी बहारदार रचना सादर केल्या.
सलीम चिश्ती, मुनवर पिरभॉय, मुमताझ पीरभॉय यांच्यासह अनेक मान्यवर ,रसिक उपस्थित होते.
सुरेशचंद्र सुरतवाला, रफीक काझी, प्रदीप निफाडकर यांनी आयोजन केले. उर्दू, हिंदी, मराठी, गुजराती अशा चार भाषातील १० कवींनी मुशायऱ्यात भाग घेतला. शेवटी सर्वांनी रसिकांसमवेत शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला.
हेमंत पुणेकर यांनी सुरेश भटांच्या ‘ मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे ‘ या गझलचा गुजराती अनुवाद सादर केला. शिवाय ‘ स्वप्न में आवजाव राखे छे ! ‘ असे आर्जवही गुजराती भाषेतून  केले !
डॉ.राहिमा पटेल यांनी जाती -धर्मभेदावर बोट ठेवले. ‘ एक सा रंग है लहू का, फिर दिलो में ये भेद क्यू है ? कही केसरिया ,कही हरा क्यू है ? ‘असा प्रश्न त्यांनी शायरीतून विचारला . तर ‘ पायवाटा आडवाटा टाळल्या मी, सरळ रस्ते सारखे का वळत होते ? ‘ असा प्रश्न सुधीर कुबेर यांनी विचारला.
 शायर  इसामुद्दीन शोला आपली कैफियत काव्यात मांडताना  म्हणाले, ‘ मै जिसके हसने की दुआँ करता रहा, उसने मुझे रुलाया, रुला के छोड दिया ‘
 ‘ विरहामध्ये सुकलीस तू,
अन्, खोल हा गेला गळा,
इतका बरा नाही गडे,
गझले, तुला माझा लळा ! ‘ असा अनुभव कवी प्रदीप निफाडकर यांनी गझलेतून मांडला.
‘बात अगर करनी है भाईचारे की,
अली को तुम दिवाली, और लखन को ईद पर देखो ! ‘
 अशी साद शमसाद टाकेदार यांनी उपस्थितांना घालून ईदच्या शुभेच्छा दिल्या.
प्रदीप निफाडकर यांनी सूत्रसंचालन केले ,सुरेशचंद्र सुरतवाला यांनी प्रास्ताविक केले .