Tuesday, 17/7/2018 | 11:09 IST+5
Punekar News

वीजमीटरचे रिडींग अचूक करा अन्यथा फौजदारी कारवाई

प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांचा इशारा

पुणे, दि. 12 : वीजग्राहकांच्या मीटरचे रिडींग अचूक करा. चुकीच्या रिडींगमुळे वीजग्राहकांना विनाकारण मनस्ताप होतो तसेच महावितरणचा महसूलही ठप्प होतो. मीटरचे अचूक रिडींग घेण्यामध्ये हयगय झाल्यास थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी मीटर रिडींग एजन्सीजला दिला आहे.

पुणे प्रादेशिक विभागात चुकीचे व सदोष रिडींग घेणाऱ्या तसेच वारंवार सूचना देऊनही कामात सुधारणा न करणार्‍या मीटर रिडींग एजन्सीजविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी पुणे, कोल्हापूर व बारामती परिमंडलातील वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले आहेत. तसेच वीजवापरानुसार योग्य व अचूक वीजबिल ग्राहकांना देण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी मीटर रिडींगच्या प्रक्रियेत कोणतीही हयगय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

पुणे परिमंडलातील वीजमीटर रिडींग संदर्भात येथील ‘प्रकाशभवन’मध्ये नुकतीच बैठक झाली. यावेळी मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री. अलोक गांगुर्डे, अधीक्षक अभियंता सर्वश्री महेंद्र दिवाकर, सुंदर लटपटे, राजेंद्र पवार, गौतम गायकवाड यांच्यासह पुणे परिमंडलातील कार्यकारी अभियंते, उपविभाग कार्यालयप्रमुख व 27 मीटर रिडींग एजन्सीजचे संचालक व सुमारे 225 मीटर रिडर्स उपस्थित होते.

पुणे प्रादेशिक विभागात वीजमीटरच्या अचूक रिडींगसाठी उपाययोजना सुरु आहेत. यात कामचुकार मीटर रिडींग एजन्सीजविरुद्ध महावितरणने कठोर कारवाईचा पवित्रा घेतला आहे. थेट फौजदारी कारवाईचा पर्याय खुला ठेवला आहे. महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे मीटर रिडींग सुरु असल्याने पूर्वीच्या तुलनेत मीटर रिडींग व वीजबिलात आणखी अचूकता आलेली आहे. रिडींग घेण्याची प्रक्रिया सुलभ झालेली आहे. पुणे परिमंडलात मीटर रिडींगमध्ये आणखी अचूकता यावी यासाठी मीटर रिडींग एजन्सीजसह त्यांचे मीटर रिडर्स यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. सदोष मीटर रिडींग चालू राहिल्यास संबंधित मीटर रिडींग एजन्सीजविरुद्ध आर्थिक दंड, काळ्या यादीत टाकणे यासोबतच फौजदारी कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Share With US

Email: punekarnews@gmail.com

Phone: +91 9766696137

Advertise with US

Email: punekarnews@gmail.com

Phone: +91 9766696137