Wednesday, 24/1/2018 | 1:36 IST+5
Punekar News

शेतकऱ्यांना 12 तास विजेसाठी मुख्यमंत्री सौर फिडर योजना


अहमदनगर : 19 एप्रिल : 
शेतकऱ्यांना दिवसा बारा तास अखंड वीज उपलब्ध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री सौर फिडर योजना राबिवण्यात येणार आहे. या योजनेतून अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी येथे पथदर्शी प्रकल्प उभारण्यात येणार असून लवकरच मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येईल, अशी घोषणा उर्जामंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.


राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मा. उर्जामंत्री श्री. बावनकुळे बोलत होते. यावेळी आमदार मा. श्री. विजय औटी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, राळेगण सिद्धीच्या सरपंच रोहिणी हजारे, महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. दीपक कुमठेकर, नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता श्री. दत्तात्रय कोळी यांच्यासह महािवतरण, महानिर्मिती, महापारेषण, राज्य उत्पादन शूल्क, पोलिस व महसूल प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. उर्जामंत्री मा. श्री. बावनकुळे म्हणाले, मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तसेच नुकत्याच झालेल्या नागपूर दौऱ्यातही पर्यावरणपूरक सौर उर्जेला प्राधान्य देण्याचे धोरण समोर ठेवले आहे. त्यानूसार त्यांनी सर्वच राज्यांना सौर उर्जा निर्मितीचे लक्ष्य दिले आहे. महाराष्ट्राला दहा हजार मेगावाट उर्जा निर्मितीचे लक्ष्य देण्यात आले आहे. हे लक्ष्य साधण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. राज्यात वर्षातील 324 दिवस उन्हाचा प्रभाव असतो. या उन्हाचा उर्जानिर्मितीसाठी उपयोग करून गावातील उर्जेची गरज गावातच भागवता येणे शक्य आहे. वीज वहनासाठी प्रती युनिट जवळपास सहा रुपये खर्च येतो. हा खर्च कमी करण्यासाठी गावातच वीज निर्माण करून त्याच गाव व परिसरात ती वापरण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. 800 ते 900 शेतकऱ्यांना  एकत्रित करून एक सोलर फिडर तयार करण्यात येईल. या फिडरवरून परिसरातील शेतकऱ्यांना वीज पुरवली जाईल. एमइआरसीने ठरवून दिलेले शेतीसाठीचे दर प्रतियुनिट जवळपास सव्वा रुपया शेतकऱ्यांनी भरणे आवश्यक आहे. या योजनेसाठी राळेगण सिद्धी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून योजनेचा पहिला पथदर्शी प्रकल्प राळेगण सिद्धीत उभा राहणार आहे. लवकरच मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे राळेगण सिद्धी येथे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी घाेषित केले.

उर्जामंत्री मा. श्री. बावनकुळे म्हणाले, राज्यात शेतीपंपाची 17 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. एकट्या नगर जिल्ह्यात कृषीपंपाची 2200 कोटी तर पथदिवे व पाणीपुरवठा योजनांची जवळपास दीडशे कोटी रुपये थकीत आहेत. शेतकऱ्यांसाठी समान पाच हप्ते पाडून दर तीन महिन्यांनी एक हप्ता अशा स्वरुपात वीज बिल भरण्याची योजना आणली असून यात बिलावरील व्याज व दंड माफ करण्यात येणार आहे. पैसेच येत नसल्याचे वीज पुरवठ्याच्या पायाभूत सुविधा उभारण्यात अडचणी येत आहेत. नवीन योजनेतून हप्त्या-हप्त्याने तरी थकबाकी भरणे आवश्यक आहे. ज्या जिल्ह्यात अशी वसूली होईल, ते पैसे त्याच जिल्ह्यात खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अडचणी व थकबाकी असूनही गेल्या अडीच वर्षांत एकाही शेतकऱ्याची  वीज जोडणी तोडण्यात आलेली नाही. वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

चौकट – अण्णांनी केले उर्जामंत्र्यांचे कौतूक
जनतेत जावून त्यांचे काम पूर्ण केल्याचे सांगणारा पहिला मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निमित्ताने प्रथमच पाहण्यात आला, अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उर्जामंत्र्यांचे कौतूक केले. गावात जावून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे त्यांचे काम “शासन तुमच्या दारी’ हे ब्रिद खरे करून दाखवणारे असून ही त्यांची कृती देशाला नवीन दिशा देईल, अशी कौतुकाची थाप श्री. अण्णा हजारे यांनी दिली.

Share With US

Email: punekarnews@gmail.com

Phone: +91 9766696137

Advertise with US

Email: punekarnews@gmail.com

Phone: +91 9766696137