सायबर गुन्ह्यांच्या पोलिसिंगसाठी महाराष्ट्र देशात अव्वल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Support Our Journalism

Contribute Now

मुंबई, दि. 15 :- ‘ व्यवहारांचे डिजिटायझेशन मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. त्यामुळे सायबर गुन्हे वाढण्याची शक्यता आहे. या आव्हानाला सामोरे जाण्याच्या सज्जतेमुळे महाराष्ट्र पोलिस देशात सायबर पोलिसिंगच्या दृष्टीने देशात अव्वल ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

वांद्रे (पश्चिम) येथील सायबर क्राईम पोलीस स्टेशन व पोलीस उप आयुक्त सायबर क्राईम कार्यालय व निवासस्थानांचे भुमिपूजन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

सोहळ्यास गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे,महासंचालक (पोलिस गृहनिर्माण) बिपीन बिहारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, व्यवहारांच्या डिजिटायझेनमुळे आता सायबर हल्लेही वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. फिशिंगच्या माध्यमातून सामान्यांची लुबाडणूक होऊ शकते. त्यामुळे एकीकडे अशा बाबतीत जाणीव जागृती करण्याची गरज आहे. तर यातूनही कुणी आमिषाला बळी पडलेच तर त्याला रक्कम परत मिळवून देण्यासाठी आणि संबंधीत गुन्हेगाराला पकडण्याची सज्जता  पोलिसांना ठेवावी लागणार आहे. शिवाय सायबर गुन्ह्यांना भौगोलिक सीमांकन नसते. जगाच्या एखाद्या  कोपऱ्यात बसूनही गुन्हेगार कार्यभाग साधू शकतो. त्यामुळे या आव्हानाला तोंड देण्यासाठीची अत्याधुनिक तंत्रप्रणाली आणि व्यवस्था उभी करावी लागते.

महाराष्ट्राने सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने व्यवस्था उभी करण्यात देशात अव्वल स्थान मिळविल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यात प्रत्येक जिल्ह्यात मिळून अशा चाळीस सायबर लॅब स्थापन करण्यात आल्या आहेत. सायबर स्पेसमधील युद्धासाठी मायक्रोसाफ्टने सायबर वार्रियरस तयार केले आहेत भारतातही सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढू शकते. धार्मिक भावना भडकावणारे, सामाजिक स्वास्थ बिघडवणारे प्रकार घडल्यास त्यांना तत्काळ अटकाव करावा लागतो. सायबर स्पेसवरुन संबंधित मजकूर हटवावा लागतो. सायबर हल्ले रोखण्यासाठी सक्षम फायरवॅाल्स तयार कराव्या लागतील. तसेच सक्षम अशी सायबर आर्मी तयार करावी लागेल. त्यासाठी राज्यात सुमारे एक हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या व्यवस्थेमुळे सायबर गुन्ह्यांना आळा घालता येईल. अन्य गुन्ह्यांच्या तपासातही सायबर सेलची मदत महत्त्वपूर्ण ठरू लागली आहे. गुन्ह्यांच्या दोषसिध्दीसाठी मोठा उपयोग होऊ लागला आहे.  यापुढे एकविसाव्या शतकातील मुल्ये-तत्वे समजावून घेत आता पोलिसिंग करावे लागेल. त्यादृष्टिने राज्याने पोलिसिंगमध्ये देशात पहिले आणि महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. यातून नागरिकांना भविष्यात मोठी सेवा मिळेल अशी आशा आहे.

पोलिस आयुक्त श्री. बर्वे यांनी प्रास्ताविकात सायबर क्राईम पोलिस स्टेशन व अनुषांगिक व्यवस्थांच्या उभारणीबाबत माहिती दिली.

तत्पुर्वी, मुख्यमंत्री श्री. फडणवीस तसेच मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेच्या अनावरणाद्वारे पोलिस स्टेशन, उपायुक्तालय,प्रकार-४ निवासस्थानांच्या बांधकामासाठी भुमिपूजन संपन्न झाले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आदी उपस्थित होते.

Punekar News is now on Telegram. For the latest Pune, Pimpri Chinchwad PCMC news, Like our Facebook Page, follow on Twitter and Instagram and also subscribe to Punekar News on Telegram.