पोलीस आयुक्तालयातील औरंगाबाद शहर सायबर लॅबच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष एम.एम. शेख, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहटकर, महापौर त्र्यंबक तुपे, आमदार अतुल सावे, संजय शिरसाठ, इम्तीयाज जलील, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची यावेळी उपस्थिती होती.

याप्रसंगी पालकमंत्री रामदास कदम म्हणाले, पोलीस अहोरात्र कष्ट करतात परंतु गुन्हेगार आता नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे करत आहेत. त्यांच्यावर वचक बसविण्यासाठी सायबर लॅब अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. लॅबमधील अद्यावत तंत्रज्ञानाचा सायबर गुन्हेगारीवर अंकुश राहून गुन्ह्यांची उकल होऊन आरोपींचा शोध घेणे सोपे होणार आहे. पोलीसांनी तणावमुक्त राहून कामगिरी पार पाडावी, असे सांगून त्यांनी पोलीसांच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

सायबर गुन्हे प्रकरणातील फिर्यादीला देण्यात येणारा 8 लाख 40 हजार रूपयांचा धनादेश क्रांती चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे पालकमंत्री रामदास कदम यांच्याहस्ते यावेळी देण्यात आला. सायबर लॅबमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही  त्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पासपोर्ट ऑनलाईन सॉफ्टवेअरचे उद्घाटन लॅपटॉपची कळ दाबून त्यांच्याहस्ते करण्यात आले.

सायबर लॅबमधील अत्याधुनिक सॉफ्टवेअरबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कल्याणकर यांनी यावेळी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. यामध्ये त्यांनी सायबर लॅबची उपयुक्तता आणि पासपोर्ट ऑनलाईन सॉफ्टवेअरबाबत माहिती देवून नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतच्या अपेक्षा पूर्ण करू. पासपोर्ट ऑनलाईन सॉफ्टवेअरमुळे पासपोर्ट पडताळणीसाठी लागणारा वेळ हा कमी होण्यासाठी मदत होणार आहे, असे सांगितले.

 प्रारंभी पोलीस विभागातर्फे पालकमंत्री रामदास कदम यांना मानवंदना देण्यात आली. फित कापून सायबर लॅबचे उद्घाटन पालकमंत्री रामदास कदम यांच्याहस्ते झाले. त्यानंतर त्यांनी सायबर लॅब, सेफ सिटी प्रकल्पाची पाहणी केली. लॅबबाबत सविस्तर माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पालकमंत्री रामदास कदम यांना दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी करून आभार मानले.