भावी पिढीने जल चळवळीचा पुढे वटवृक्ष करावा – जिल्हाधिकारी

Share this News:

सातारा, दि. 14 (जिमाका): सातारा‍ जिल्ह्यातील जलयुक्त् शिवार अभियानांतर्गत लोक सहभागामुळे झालेली जलक्रांती ही दिशा देणारी असून याचा आदर्श घेऊन भावी पिढीने या जल चळवळीचा पुढे वटवृक्ष करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांनी केले आहे. कराड तालुक्यातील तांबवे येथील संगम गणेश मंडळाच्या वतीने कलागौरव पुरस्कार व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने संवादपर्व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रांताधिकारी किशोर पवार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, तहसीलदार राजेंद्र शेळके, पोलीस निरिक्षक अण्णासाहेब मांजरे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, सहायक पोलीस निरीक्षक दीपीका जौंजाळ, गट शिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, सरपंच संतोष कुंभार, उपसरपंच रवींद्र ताटे, आर. के. पाटील, उद्योजक मुकूंद चरेगावकर, पत्रकार हेमंत पवार, संगम गणेश मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, उपाध्यक्ष ॲड. विजयसिंह पाटील, संगम गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष मंगेश पाटील, उपाध्यक्ष्ाम सौरभ देसाई, सचिव विशाल पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगम गणेश मंडळाच्या वतीने झी मराठी टी.व्ही.च्या लिटल चँप असलेला गायक पद्मनाभ गायकवाड याचा कलागौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर मंत्रालयात सहायक पदावर नियुक्ती झालेल्या योगेश पाटील व लंडन येथे इंजिनिअरिंग सायन्समध्ये पदवी घेतलेल्या तेजस्विनी साठे यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलतांना श्री. मुद्‌गल पुढे म्हणाले, शासनाने जलयुक्त शिवार अभियानाव्दारे शिवारामधील पाणी साठा वाढवून लोकांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. पाणी या मुद्यावर गावा-गावात एकी निर्माण झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगले काम झालेले आहे. या अभियानाच्या माध्यमातून 1.3 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे. जिथे जास्त पाणी आहे तिथे जास्त पाण्याच्या वापराने जमिनी क्षारपड होऊन उत्पादन क्षमता कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाण्याचे मुल्य समजावून घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून जलयुक्त अभियानाचे प्रबोधन लोकांना प्रेरणा देणारे आहे, ही आनंदाची बाब आहे. तांबवे गावाचा इतिहास गौरवशाली असून क्रांतिकारी विचारांचा प्रसार करण्याचे काम तांबवे गावाने केले आहे. चांगली विचारधारा जोपासून समाजातील उत्कृष्ट कलागुणांचा गौरव करुन समाजाची शक्ती वाढवण्याचे कार्य संगम गणेश मंडळाने केले आहे.

विद्यार्थी दत्तक योजना मंडळाचा हा उपक्रम समाजाला प्रेरणादायी असल्याचे मत जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांनी व्यक्त केले आहे. पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा संगम गणेशोत्सव मंडळाने सुरु ठेवली आहे. मंडळाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते यावेळी म्हणाले, शासनाने सर्व सामान्यांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांना व्हावी, हा उद्देश ठेऊन संवादपर्व उपक्रम राबविला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी चळवळ ही जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राबविली गेली आहे. जिल्हाधिकारी श्री. मुद्‌गल यांनी जलयुक्त शिवार अभियान अंत्यत चांगल्या पध्दतीने राबवून लोकांमध्ये उर्जा निर्माण करण्याचे काम केले आहे.

संगम गणेश मंडळाने समाजातील चांगले काम करणा-या व्यक्तींच्या पाठीवर शाबासकीचा हात ठेवून त्यांना प्रोत्साहीत करण्याचा चांगला उपक्रम राबवून एक अनोखा संगम साधण्याचे काम केले आहे, असेही ते म्हणाले. प्रातांधिकारी किशोर पवार म्हणाले, शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या बाबतीत सर्व प्रकारची मदत केली जाईल. संगम गणेश मंडळाचे काम हे आदर्श गणेशोत्सवाचे उदाहरण आहे. यावेळी जिल्हा माहिती कार्यालय निर्मित जलयुक्त शिवार अभियानावर आधारित माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रसिध्द गायक पद्मनाथ गायकवाड, तेजस्विनी साठे यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मुख्याध्यापक पांडूरंग पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन हेमंत पवार यांनी केले. या कार्यक्रमास मंडळाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.