भारतातल्या दीडशे चित्रकारांचे 19 ते 21 सप्टेंबर दरम्यान बालगंधर्वला प्रदर्शन

Share this News:
पुणे, 15/9/2019 : सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने भारतातील तब्बल दीडशे चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. ‘जाणीव कलाकारांना पूरग्रस्तांची’ या नावाने भरविण्यात येणाऱ्या या प्रदर्शनाचे आयोजन चित्रकारांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या पुण्यातील आर्ट बिट्स फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे. हे प्रदर्शन येत्या 19 ते 21 सप्टेंबर दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे सकाळी दहा ते सायंकाळी आठ या वेळेत चित्ररसिकांना विनामूल्य पाहायला मिळणार आहे. या प्रदर्शनात विक्री झालेल्या चित्रांच्या रकमेतील पन्नास टक्के रक्कम पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे, अशी माहिती आर्ट बिट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पांचाळ यांनी दिली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता बालगंधर्व कलादालन येथे अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल बळवंत यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, कोरिओग्राफर, दिग्दर्शक मुकेश चौधरी, प्रकाश कोळेकर, चक्रधर बाढेकर उपस्थित राहणार आहेत. तर प्रदर्शनाच्या समारोप 21 सप्टेंबर रोजी होणार असून, यावेळी ‘जाणीव पुरस्कार’ वितरण समारंभ होणार आहे, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसेवा समूहाचे राहुल पोकळे, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, प्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी उपस्थित राहणार आहेत.

संतोष पांचाळ यांनी सांगितले, की भारतातल्या विविध प्रांतातून तब्बल दीडशे प्रसिद्ध चित्रकार या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात चित्रकारांचा सहभाग असल्याने एकाहून एक सरस चित्रे रसिकांना पाहायला मिळणार आहेत. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या रसिकांना लाईव्ह स्केच आणि निसर्ग चित्रांच्या रेखाटनाचा अनुभव घेता येणार आहे. रसिकांना स्वतःची स्केच प्रसिध्द चित्रकारांकडून काढून घेता येणार आहेत. तसेच पोर्ट्रेट, रांगोळी, निसर्गचित्रांची प्रात्यक्षिके अनुभवण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली आहे.