एसटी महामंडळात नियुक्त १६३ महिला बसचालकांच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ

Share this News:

पुणे, दि 23/8/2019: महिला रिक्षा चालवतात, कार चालवतात, काही महिला मिनी स्कूलबसही चालवतात, पण मोठी अवजड बस चालवताना महिला सहसा दिसत नाहीत. आता मात्र हे चित्र बदलणार आहे. एसटी महामंडळाने बसचे स्टेअरींग आता महिलांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला असून पहिल्या टप्प्यात १६३ महिला चालक तथा वाहकांची निवड करण्यात आली आहे. या महिलांना पुणे येथे आज झालेल्या समारंभात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देऊन त्यांच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. या महिला बसचालक तथा वाहकांना आता एसटी महामंडळामार्फत एक वर्षाचे अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर या महिला प्रत्यक्ष रस्त्यावर एसटीची बस चालविताना दिसतील. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला देशातील अशा स्वरुपाचा हा पहिला उपक्रम आहे.

कोणत्याही क्षेत्रात संधी मिळाल्यास महिला आपले कर्तृत्व सिद्ध करतात. महिलांना एसटी बस चालक म्हणून प्रशिक्षण देऊन महामंडळाने सामाजिक आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे पाऊल टाकले आहे. या महिला जेव्हा एसटीची बस चालवू लागतील तेव्हा त्यांचा आत्मविश्वास आणि धाडस सर्वांना प्रेरक ठरेल, असा विश्वास माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार माधुरी मिसाळ, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेचे संचालक कॅप्टन राजेंद्र सनेर – पाटील, महामंडळाचे सरव्यवस्थापक माधव काळे यांच्यासह नवनियुक्त महिला बसचालक उपस्थित होत्या.

मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्याचा गौरव

श्रीमती प्रतिभाताई पाटील पुढे म्हणाल्या की, अनेक खडतर आव्हानांचा सामना करत एसटी महामंडळाचे काम यशस्वीपणे सुरू आहे. महामंडळाच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या विविध योजना समाजासाठी उपयुक्त आहेत. महिलांना एसटी चालकांचे प्रशिक्षण देऊन महामंडळाने त्यांना जगण्याचा नवा मार्ग दाखवला आहे. हे पाऊल अत्यंत धाडसी असून ते यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सामुहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. एसटी महामंडळाचा हा उपक्रम देशासमोर नवा आदर्श निर्माण करेल, असे त्या म्हणाल्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अनुसरुन मंत्री दिवाकर रावते हे काम करीत असून अत्यंत निर्धाराने ते एसटी महामंडळाचा कायापालट घडवित आहेत, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.

परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले की, एसटी महामंडळात सकारात्मकता निर्माण करण्याचे काम केले आहे. सुरुवातीला महिला टॅक्सीचालकाची योजना राबविली. त्यानंतर महिला चालकांसाठी अबोली रंगाच्या रिक्षांचा प्रयोग यशस्वीपणे राबविला. महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केले. एसटी महामंडळात 163 महिला बस चालकांची नियुक्ती करुन त्यांना प्रशिक्षण देण्याचा हा प्रयोग देशभरातील महिला-मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी आहे, असे ते म्हणाले. सध्या एसटी महामंडळात 36 हजार बस चालक असून पुढील काही वर्षात किमान 10 हजार महिला बस चालक असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एसटी कर्मचाऱ्यांकरिता डोळे तपासण्यासाठी पुण्यामध्ये व्हिजन नेक्स्ट या जागतिक दर्जाच्या रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. 55 वर्षानंतर स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे सर्व लाभ देण्याबरोबरच 10 लाख रुपये देण्यात येतील. निवृत्त कर्मचाऱ्यांना पती-पत्नीसाठी 65 वर्षांपर्यंत मोफत प्रवासाची सवलत देण्यात येईल, असेही मंत्री श्री. रावते यांनी यावेळी घोषीत केले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, आजचा दिवस महिला सक्षमीकरणासाठी ऐतिहसिक दिवस आहे. महिला सशक्तीकरणाच्या धोरणाचे कृतिशील पाऊल एसटी महामंडळाने टाकले आहे. महिलांना प्रसुती काळात दिर्घ रजा देण्याचा एसटी महामंडळाचा निर्णयही कौतुकास्पद आहे. महामंडळाने आता बसस्थानकांवर महिलांसाठी चांगली स्वच्छतागृहे उपलब्ध होतील यासाठी मोहीम हाती घ्यावी,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 15 महिला एसटी चालकांना प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यात प्रतिक्षा सांगवे (पुणे), सरोज हांडे (कोल्हापूर), मीना व्हनमाने (सांगली), पूनम डांगे (सोलापूर), माधवी साळवे (नाशिक), ज्योती आखाडे (जळगाव), मंजूळा धोत्रे (धुळे), रेश्मा शेख (परभणी), भाग्यश्री परनाटे (अमरावती), भावना जाधव (बुलढाणा), अंकीता आगलावे (यवतमाळ), गीता गिरी (नागपूर), रब्बना पठाण (वर्धा), राखी भोतमांगे (भंडारा), पौर्णिमा कुमरे (गडचिरोली) या प्रातिनिधीक नवनियुक्त महिला बसचालकांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.

महिलांची बसचालक तथा वाहकपदी भरती करण्याच्या दृष्टीने त्यांना अनुभव तसेच उंचीच्या अटीमध्ये काही सूट देण्यात आल्या होत्या.. आदिवासी भागात २१ महिलांना आधी हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या महिलांना आता अवजड वाहनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर मागील वर्षी जाहीर करण्यात आलेल्या भरतीमध्ये एकूण ९३२ महिला उमेदवारांनी चालक तथा वाहक पदाकरीता अर्ज केला होता. त्यापैकी ७४३ महिला उमेदवार लेखी परिक्षेत उत्तीर्ण झाल्या. त्यातील १४२ महिले अंतिमत: प्रशिक्षणासाठी पात्र ठरल्या आहेत. या महिलांना सुरुवातीला एक आठवडा पुण्यातील भोसरी येथील प्रशिक्षण केंद्रात आणि त्यानंतर त्यांच्या विभाग अथवा जिल्हास्तरावर अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सन 2017 व 2018 साली विशेष कामगिरी केलेल्या तसेच पुरपरिस्थितीत आदर्शवत काम केलेल्या एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.