वीजबिल भरण्यात बारामती परिमंडलातील 3 लाख 71 हजार वीजग्राहक ‘ऑनलाईन’

Share this News:

बारामती, दि. 16 सप्टेंबर 2019 : महावितरणची वेबसाईट व मोबाईल ऍ़पद्वारे ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांची संख्या बारामती परिमंडलात 3 लाख 71 हजारांवर गेली आहे तर गेल्या आॅगस्ट महिन्यात 55 कोटी 91 लाख रुपयांचा वीजबिल भरणा झाला आहे. क्रेडीट कार्ड वगळता अन्य पर्यायांद्वारे ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा निशुल्क करण्यात आला असून 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांचा ‘ऑनलाईन’कडे कल अधिक वाढत आहे.

वीजबील भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहणे टाळून घरबसल्या कोणत्याही वेळेत ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्याची सोय वीजग्राहकांना उपलब्ध झाली आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईट व मोबाईल ऍ़पद्वारे वीजबिल भरण्यास वीजग्राहकांची पसंती दिवसेंदिवस वाढत असल्याची स्थिती आहे. महावितरणकडून ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्यासाठी विविध उपक्रमांतून ग्राहकांना सातत्याने माहिती देण्यात येत आहे. गेल्या आॅगस्टमध्ये बारामती मंडल अंतर्गत बारामती, दौंड, शिरूर, पुरंदर, इंदापूर व भोर (जि. पुणे) तालुक्यामधील 71 हजार वीजग्राहकांनी 14 कोटी 20 लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा केला आहे.

‘ऑनलाईन’ बिल भरणा झाले निःशुल्क – क्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’चे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क करण्यात आले आहे. याआधी नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅश कार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’द्वारे होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क करण्यात आलेला आहे.

‘ऑनलाईन’ बिल भरल्यास 0.25 टक्के सूट – लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. ही सूट मिळविण्यासाठी संबंधीत ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी नसावी तसेच वीजबिलांचा भरणा हा प्रॉम्ट पेमेंट डिस्काऊंटच्या निर्धारित वेळेत करणे आवश्यक आहे.

महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच जून 2016 पासून मोबाईल ऍ़पद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल ऍ़पवरून वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणे केले आहे.