पेनांच्या तब्बल ३०० रिफिलद्वारे साकारले अटलजींचे रेखाचित्र

Share this News:

पुणे, 25/12/2019 : स्थितप्रज्ञ नेता, उत्कृष्ट संसदपटू, धुरंधर राजकारणपटू, लेखक, कवी अशा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तीमत्वाच्या विविध पैलूंमुळे त्यांची एक विशेष ओळख होती. त्यामुळे अटलजींच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाला साजेसे असे अभिवादन पुण्यात करण्यात आले. पेनांच्या तब्बल ३०० रिफिलद्वारे अटलजींचे सुरेख असे रेखाचित्र साकारुन त्यांना चित्रयज्ञाद्वारे मानवंदना देण्यात आली.

माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त निनाद पतसंस्था व कलातीर्थ संगीत-चित्रकला विद्यालयातर्फे सलग १२ तास चित्रे काढून चित्रयज्ञाद्वारे सदाशिव पेठेतील खुन्या मुरलीधर चौकातील अटल कट्टयावर त्यांचे स्मरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.न.म.जोशी, निनाद पतसंस्थेचे उदय जोशी व सर्व संचालक, कलातीर्थ संगीत-चित्रकला विद्यालयाचे अमोल काळे, स्नेहांकूरच्या वृषाली दातार, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, किशोर खैराटकर, महेश कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

दिवसभर कलातीर्थच्या २५० विद्यार्थ्यांनी अखंड १२ तास विविध चित्रे साकारत हा चित्रयज्ञ साकारला. ज्येष्ठ संगीतकार अशोक काळे यांना चित्रयज्ञाच्या या कार्यक्रमातून श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली.

डॉ.न.म.जोशी म्हणाले, कर्तव्यनिष्ठतेने उभारलेला हा चित्रयज्ञ आहे. देशाची बदनामी करणारे अनेक कार्यक्रम विविध ठिकाणी होतात. मात्र, अटल कट्टयावर होणारे कार्यक्रम देशाची मान उंचावणारे आहेत. अटलजींच्या गीतांच्याा व कवितांच्या आशय घेऊन आपण वाटचाल करायला हवी.

अमोल काळे म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी यांचे भारतावर प्रचंड प्रेम होते. त्यांच्यामध्ये एक प्रतिभावान कवी देखील दडलेला होता. त्यांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचावे त्यांची माहिती तरुण पिढीला व्हावी. यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी चित्रे रेखाटून त्यांचे स्मरण केले. त्यांचे विचार दैनंदिन जीवनात आचारणात आणू, असा निश्चय देखील उपस्थितांनी केला.