डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय  स्मारकाच्या रख़डलेल्या  बांधकामास 14 एप्रिल पासून सुरुवात होणार.

Share this News:

– राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांच्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्याचे आश्वासन.

 मुंबई – दि.23 : 14 एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 125 वी जयंती आहे. या निमित्ताने इंदूमिल येथील त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाची सुरुवात करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ.प्रकाश गजभिये यांनी तारांकित प्रश्नांद्वारे विधानपरिषदेत केली.यावर 14 एप्रिल 2016 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या बांधकामाची  सुरुवात करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

     यावेळी बोलताना  आ.प्रकाश गजभिये म्हणाले डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदूमिल येथील 12 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 11 नोव्हेंबर 2015 ला  करण्यात आले होते, परंतु अद्यापही त्या जागेवर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाची सुरुवात झालेली नाही.स्मारकासाठी मंजूर झालेल्या इंदू मिलच्या जागेचे हस्तांतरण कायदेशीररित्या झालेले नाही. त्यामुळे स्मारकाच्या बांधकामात प्रगती दिसत नसल्याने ते केव्हा सुरु करणार व जागेचे हस्तांतरण केंव्हा करणार ? असा  सवाल गजभिये यांनी  विधानपरिषदेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला तसेच आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामसाठी किती निधी राज्य सरकारने उपलब्ध करुन दिला व आता बांधकामची सद्यस्थिती काय ? याबाबत सरकारकडे विचारणा केली.

   यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले इंदु मिलची 12 एकर जागा भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीयस्मारकासाठी राष्ट्रीय स्मारक महामंडळाकडून राज्य शासनाला हस्तांतरीत झाली नाही, ही वस्तुस्थितीआहे. परंतु त्या ठिकाणी काम करण्याकरिता शासनाकडून पूर्ण परवानगी देण्यात येईल व जागेच्या हस्तांतरण संदर्भात मा.वस्त्रोद्योग मंत्री, भारत सरकार, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीयवस्त्रोद्योग महामंडळ व महाराष्ट्र सरकार हा त्रिपक्षीय करार (MOU) दि. 05/04/2015 रोजी नवी दिल्ली येथे झाला. सदर करारामधील खंड क्र. 2.1 नुसार इंदुमिल 6 ची जागा हस्तांतरण होणे संदर्भात राष्ट्रीयवस्त्रोद्योग महामंडळास द्यावयाचा मोबदला, त्याबाबत अटी, शर्ती अंतिम करणेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने 28/09/2015 रोजी अहवाल सादर केला परंतु केंद्र सरकारने उत्तर पाठविलेनाही. पुन्हा स्मरणपत्र दि. 09/03/2016  रोजी पाठविले आहे. या स्मारकाच्या विकासाचे काम एमएमआरडीए कडे दिले असून बृहत आराखडा केंव्हा पर्यंत तयार केला जाईल, हा आराखडा अंतिमकरण्यासाठी मा. मंत्री (सामाजिक न्याय) यांनी एक सदस्यीय समिती तयार केलेली आहे. व बांधकामासाठी रु. 125 करोडो रुपयाचा निधी एमएमआरडीएच्या बजेट मध्ये तरतूद केलेली आहे असे मा.मुख्यमंत्र्यांनी आमदार प्रकाश गजभिये यांच्या प्रश्नास उत्तर दिले पंरतु 2003 पासून या स्मारकाचे बांधकाम रखडले व आजपर्यंत जागा हस्तांतरीत झाली नाही. वस्त्रोद्योग महामंडळाला 1433 कोटीद्यावयाचे आहे. त्या रक्कमेचे समायोजन करुन स्मारकाचे बांधकाम 14 एप्रिल पासून सुरु करण्यात येईल असे आश्वासन मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आमदार प्रकाश गजभिये यांना दिले. परंतु राज्य शासनाने 14 एप्रिल पासून स्मारकांचे बांधकाम सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारा आमदार प्रकाश गजभिये यांनी दिला आहे.