‘एक ही भूल, कमल का फूल’ सुवर्णकारांची भावना  – जयंत पाटील

Share this News:

मुंबई – दि.1  : सध्या सुरू असलेल्या सराफांच्या देशव्यापी संपाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही पाटील यांनी यावेळी हल्लाबोल केला. सराफांनी २०१२ सालीही अशाच पद्धतीने अबकारी कर रद्द करण्यासाठी संप केला होता. त्या वेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी संप पुकारलेल्या सराफांना पाठिंबा दिला होता. मात्र सत्तेत येताच या बाबीचा त्यांना विसर पडला आहे. त्यामुळे एक ही भूल, कमल का फूल अशी भावना या सराफांची झाली असल्याचे म्हणत पाटील यांनी भाजपच्या दुखऱ्या नसेवरच बोट ठेवले.

यानंतर भाजपच्या आमदारांनी पंतप्रधानांचे नाव सभागृहात घेऊ नये, असे सांगत सभागृहात गोंधळ केला. पण पाटील यांनी पंतप्रधानांचे नाव आपण घेऊ शकतो, त्यांचे नाव घ्यायचे नाही हे व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणल्यासारखे आहे, असे म्हणत या मुद्द्यास हरकत घेतली. त्यामुळे हा विषय कामकाजातून काढू नये, अशी विनंती पाटील यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना केली. बागडे यांनीही याची दखल घेत सराफांच्या संपाचा मुद्दा केंद्राच्या अखत्यारीत असला तरी राज्यातील सराफही त्यात सहभागी झाले असल्यामुळे सराफांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे, असे निर्देश दिले.