Friday, 20/7/2018 | 1:38 IST+5
Punekar News

अग्निशमन जवानांच्या तत्परतेने महिला सुखरुप; अनर्थ टळला

अग्निशमन जवानांच्या तत्परतेने महिला सुखरुप; अनर्थ टळला

पुणे | आज दुपारी साडेबारा वाजता धनकवडी, मोहननगर येथील शिवशंकर अपार्टमेंटच्या एका फ्लॅटमधे मोठ्या प्रमाणात धूर झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. फ्लॅटचे दार बंद असून आतमध्ये एक महिला अडकली असल्याचे नागरिकांनी सांगितले. नियंत्रण कक्षाकडून लगेचच कात्रज अग्निशमन केंद्रातील फायरगाडी व देवदूत क्विक रिस्पॉन्स टिम रवाना करण्यात आली.

घटनास्थळी पोहचताच बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरुन धूर येत असल्याचे जवानांनी पाहिले व त्यांनी त्या फ्लॅटकडे धाव घेतली. फ्लॅटचा दरवाजा आतमधून बंद केला असल्याची खात्री होताच जवानांनी कटरच्या साह्याने लोखंडी दरवाजा कापून घरामधे प्रवेश केला. तेव्हा किचनमधे गॅस शेगडीवर बराच वेळ कुकर सुरू असून त्यामुळे घरामधे धूर पसरला असल्याचे व एकीकडे घरातील महिला शुद्धित नसल्याचे जवानांनी पाहिले. तातडीने महिलेला शुद्धिवर आणत व गॅस बंद करुन पुढील धोका दूर केला. अग्निशमन अधिकारी प्रकाश गोरे यांनी घटनेचे गांभीर्य पाहात अँब्युलंसला ही पाचारण केले. परंतू, सदर महिलेच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली असून औषधे सुरु असल्याने त्यांना गाढ झोप लागल्याची प्राथमिक माहिती जवानांना समजली. वेळीच नागरिकांनी दलास कळविल्याने व तत्परतेने जवान घटनास्थळी दाखल झाल्यानेच मोठा अनर्थ टळला अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली. वेळीच दरवाजा तोडला नसता तर धुरामुळे गुदमरुन काय घडले असते याचा विचारच न केलेला बरा….

या कामगिरीमधे कात्रज अग्निशमन केंद्राचे अग्निशमन अधिकारी प्रकाश गोरे, तांडेल दत्तात्रय थोरात, वाहन चालक अनंता जागडे व जवान राजेश घडशी, किरण पाटील, जयेश लबडे, अमोल कर्डेकर, रमेश मांगडे आणि देवदूत क्विक रिस्पॉन्स टिमचे राहुल मालुसरे, निलेश तागुंदे, तुषार पवार यांनी सहभाग घेतला.

Share With US

Email: punekarnews@gmail.com

Phone: +91 9766696137

Advertise with US

Email: punekarnews@gmail.com

Phone: +91 9766696137