पुण्यातील २७ नागरिकांची नमुना चाचणी निगेटीव्ह कोरोना बाधित 16 व्यक्तींची प्रकृती स्थिर -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

Share this News:

पुणे,दि.16- राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविलेल्या व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांपैकी 28 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 27 व्यक्ती कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. दरम्यान यापूर्वी आढळलेल्या 16 कोरोना बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना संदर्भात प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक नांदापूरकर आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, सध्या 28 पैकी 27 जणांच्या नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र, चीन, इटली, इराण, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, दक्षिण कोरियाबरोबरच आता दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून आलेल्या नागरिकांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्णांच्या उपचारासाठी येणारा खर्च हा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून उपयोगात आणला जाणार असल्याची माहिती देऊन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांना निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा निधी विभागीय आयुक्तांकडे दिला जाईल. तिथून आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळ्या जिल्ह्यांना या निधीचे वाटप केले जाईल. जो निधी उपलब्ध करून दिला जाईल, त्याद्वारे पुणे व उर्वरीत चार जिल्ह्यांना निधी दिला जाईल. याच प्रमाणे अन्य विभागीय आयुक्तांकडे देखील असाच निधी दिला जाईल. स्थानिक स्तरावरील निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, मुख्यमंत्री महोदयांनी आज सकाळी राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. मुख्य सचिव, आरोग्य सचिव व अन्य अधिकारी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला उपस्थित होते.

दुबई, सौदी अरेबिया व युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या तीन देशांमधून जर कोणी परदेशी प्रवासी इथे आले तर त्यांच्याबाबतीत अन्य सात देशांप्रमाणेच प्रोटोकॉल फॉलो केला जाणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेची पथके घरांचा सर्वे करून माहिती गोळा करीत आहे. आतापर्यंत 15 हजार 803 घरांमध्ये व 52 हजार 714 लोकांचा सर्वे पूर्ण केलेला आहे. या पथकांना संशयित वाटलेल्या दोन जणांना आज नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, काल रात्री विमानाने आलेल्या प्रवाशांपैकी सात प्रवाशांनी त्यांना प्राथमिक स्वरुपातील काही लक्षणे जाणवत असल्याचे सांगितले. या प्रवाशांनी स्वतः याबाबत माहिती दिल्याने त्यांना नायडू रुग्णालयात दाखल केले आहे. तेथील डॉक्टर त्यांना तपासून आवश्यक असेल तर त्यांचे नमुने घेतील आणि नमुन्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे पुढील कार्यवाही ठरेल. डॉक्टरांच्या मते त्यांना केवळ घरी विलगीकरण कक्षात राहणे अपेक्षित असेल, तर त्यांना तशा सूचना दिल्या जातील व ते त्यांच्या घरी जातील. एक प्रवासी दोन महिने जर्मनीत राहिलेला होता. त्याला नायडू रुग्णालयात दाखल करून या ठिकाणी त्याचे नमुने घेण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, शहरासह जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत आदेश आहेत. स्वतंत्र १४४ चे आदेश नाहीत. १४४ (१) च्या आदेशानुसार प्रशासनाचे आदेश न पाळणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी आहे, याची अंमलबजावणी पोलीस करतील.पुण्यात सध्या कुठेही संचारबंदी किंवा जमावबंदी नाही. यापूर्वीच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र तसेच लगतच्या क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे संपूर्ण पुणे जिल्हयातील सर्व शाळा बंद राहतील असे त्यांनी स्पष्ट केले.

यात्रा, जत्रा, मोठे उत्सव याठिकाणी होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले असून कुठेही गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. एकमेकांसोबतचा संपर्क टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.