देशभक्त तरुणांसाठी खुषखबर; भारतीय वायुसेना भरतीचा ‘कॅम्प’ आता भोसरीत!

Share this News:

पिंपरी :

महाराष्ट्रातील तरुणांच्या मनामध्ये देशाभिमान ठासून भरला आहे. देशाच्या संरक्षणासाठी सैन्यात भरती व्‍हावे, असे बहुतांश युवकांचे स्वप्न असते. अशा ध्येयवेड्या युवकांसाठी भारतीय वायुसेनेत भरती होण्याची सुवर्ण संधी आता भोसरीत उपलब्ध होणार आहे. आमदार महेश लांडगे आणि भोसरी परिसरातील माजी सैनिकांच्या पाठपुराव्यामुळे हा भरती ‘कॅम्प’ आयोजित केला आहे.
भारतीय वायुसेना प्रशासन आणि महेश लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारी, गावजत्रा मैदानावर दि. २३ जुलै २०१९ आणि २६ जुलै २०१९ रोजी सकाळी ६ ते १० या वेळेत हा ‘कॅम्प’ होणार आहे. भारतीय वायुसेनेतील ‘गरुड कमांडोज’ या पदाकरीता ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, थेट पद्धतीने होणा-या या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नाही.

दि. २३ जुलै रोजी होणा-या कॅम्पमध्ये पुणे, ठाणे, सोलापूर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, कोल्हापूर, नागपूर, नंदुरबार, उस्मानाबाद, यवतमाळ अशा एकूण १४ जिल्ह्यातील युवकांना सहभागी होता येणार आहे. तसेच, दि. २६ जुलै रोजी होणा-या कॅम्पमध्ये अहमदनगर, बीड, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, वाशिम, वर्धा अशा एकूण १३ जिल्ह्यातील युवकांना सहभागी होता येणार आहे. याबाबत www.airmenselection.cdac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. शहर आणि परिसरातील जास्तीत-जास्त युवकांनी या भरती प्रक्रियेत सहभागी व्‍हावे, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

महेश लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशनचे कुंदन लांडगे यांनी सांगितले की, भारतीय वायुसेना प्रशासन सिव्‍हीलमध्ये सहभागी होवून ज्यावेळी भरती प्रक्रिया राबवते. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घेतली जाते. त्यासाठी ‘इंन्फ्रास्ट्रक्चर’ची उपलब्ध करुन द्यावी लागते. पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील युवकांना सैन्यात भरती होण्याची संधी उपलब्ध व्‍हावी म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घेवून भारतीय वायुसेना प्रशासनाकडे हा भरती कॅम्प घेण्याची विनंती केली होती. विशेष म्हणजे, परिसरातील निवृत्त सैनिकांनी याबाबत पुढाकार घेतला आहे.

भारतीय वायुसेना निवृत्त लायजयन ऑफिसर शौकत शेख म्हणाले की, भोसरीत वायुसेना भरती कॅम्प व्‍हावा, अशी आमची अपेक्षा होती. याबाबत आम्ही भारतीय वायुसेना प्रशासनाकडे मागणी केली. यावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी घेतली. त्यासाठी लागणारा तंबू, मैदान, मंडप, सुरक्षा साधणे, टेबल-खूर्च्या यांसह सर्व ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ उभारणीची तयारी महेश लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशनने दर्शवली आहे. या भरती कॅम्पसाठी वायुसेनेचे ब्रिगेडिअर, लेफ्टनंट जनरल विंग कमांडर दर्जाचे पाच अधिकारी व ८० जणांचा स्टाफ उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी शारीरिक क्षमता चाचणी-एक होईल. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी- दोन होईल. त्यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

भरती प्रक्रियेची पात्रता व अटी :
– जन्म तारीख : १९ जुलै १९९९ ते १ जुलै २००३ या दरम्यानचा जन्म असावा.
– शैक्षणिक : १२ वी उत्तीर्ण, इंग्रजीमध्ये किमान ५० टक्के गुण असावेत, तसेच कोणत्याही शाखेतून किमान ५० टक्के सरासरी गुण आवश्यक आहेत.
– उंची : १५२.५ सेमी (कमीत कमी)

आवश्यक कागदपत्रे :
– मूळ १० वी प्रमाणपत्र आणि ४ प्रती.
– मूळ १२ वी गुणपत्रिका आणि ४ प्रती.
– मूळ १२ वी प्रमाणपत्र आणि ४ प्रती.
– १० फोटो (पासपोर्ट आकारातील).