भाजपने केलेली चुकीची कामे लोकांसमोर मांडा अजित पवार यांचे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आवाहन

पिंपरी (9 ऑक्टोबर 2019) : पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत गाफील न राहता प्रभागवार प्रचारयंत्रणा राबवावी. भाजपने केलेली चुकीची कामे लोकांसमोर मांडावीत, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आघाडीचे पिंपरी मतदारसंघातील उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांनी आज पिंपरीत नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आघाडीचे पिंपरी मतदारसंघातील उमेदवार अण्णा बनसोडे, पिंपरी चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगलाताई कदम, योगेश बहल, रंगनाथ फुगे, वैशाली घोडेकर, कविचंद भाट, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, स्थायी समितीचे माजी सभापती जगदीश शेट्टी, अजित गव्हाणे, शमीम पठाण, राष्ट्रवादीचे प्रवक्ते फजल शेख, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, भाजपच्या वतीने 370वे कलम रद्द केल्याचा मुद्दा फोकस केला जात आहे. अर्थात्‌ 370वे कलम रद्द केल्याचे राष्ट्रवादीने स्वागतच केले आहे. मात्र, शेतक-यांचे प्रश्न, महिला सुरक्षेचा प्रश्न, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न 370वे कलम रद्द करून सुटणार नाहीत. हे लोकांमध्ये जाऊन सांगितले पाहिजे. प्रत्येक निवडणुकीत मतदार वेगळा विचार करून मतदान करत असतो. त्यामुळेच छत्तीसगढ, राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यात कॉंग्रेसच्या विचाराची सरकारे आली. हे लक्षात घ्या व कामाला लागा, असे आवाहन पवार यांनी केले.

यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. शहरात गुन्हेगारी वाढत आहे, महिला व मुली सुरक्षित नाहीत. पोलिस आयुक्तालय होऊनही काहीही उपयोग झालेला नाही. राष्ट्रवादीच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. मात्र, भाजपने शहराची वाट लावून टाकली आहे, असे पवार म्हणाले.