हिंदी आणि पँसिफिक महासागराच्या सीमेवरील एका शिंपल्याचे मूळ कच्छमध्ये 

????????????????????????????????????

Share this News:
पुणे, 6/9/2019 : हिंदी महासागर आणि पँसिफिक  महासागर यांच्या सीमावर्ती भागातील न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांभोवतीच्या सागरी पाण्यात डोसिनिस्का या प्रजातीचे शिंपले आढळतात. डोसिनिस्का असे नाव विल्ल्यम डॅल यांनी १९०२ साली दिले. त्या काळी या प्रजातीच्या जीवाश्माची काहीच माहिती नव्हती. त्यामुळे डोसिनिस्का  ही  प्रजाती फार प्राचीन नसावी असे मानले गेले. कालांतराने डॉ. ओटूका यांना जपानमधील  प्लाईस्टोसीन युगातील म्हणजे अगदी अलीकडच्या कालखंडातील (जेमतेम २५ लाख वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या)  खडकांमध्ये डोसिनिस्का प्रजातीचे जीवाश्म आढळले. यातून डोसिनिस्का प्रजातीची उत्पत्ती हिंदी आणि पसिफिक महासागराच्या सीमावर्ती भागातच २५ लाख वर्षांपूर्वी झाली असा निष्कर्ष निघतो.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील अतिथी प्राध्यापक आणि जेष्ठ पुराजीव वैज्ञानिक डॉ. विद्याधर बोरकर आणि आघारकर संशोधन संस्थेतील वैज्ञानिक डॉ. कांतीमती कुलकर्णी हे दोघे गेल्या २० वर्षांपासून कच्छमधील मायोसीन युगातील मृदुकाय (मालुस्का) गणातील जीवाश्मांवर संशोधन करत आहेत.  त्यांना डोसिनिस्का प्रजातीच्या शिंपल्यांचे जीवाश्म कच्छमधील अबडासा तालुक्यातील दोन कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या पाषाण प्रस्तरांमध्ये मिळाले. इतकेच नव्हे, तर सिंध आणि बलुचिस्तान प्रांतांमध्ये जे पाषाण प्रस्तर ५३ लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आले, त्यामध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या विभागातील सुप्रसिद्ध पुराजीव वैज्ञानिक अर्नेस्ट फ्रेडेनबुर्ग यांनी ९० वर्षांपूर्वी काही जीवाश्मांचा अभ्यास करून त्याचा अहवाल १९२६ साली भारतीय भू वैज्ञानिक सर्वेक्षणाच्या अभिलेखांद्वारे प्रसिद्ध केला होता. त्यातील काही जीवाश्म वेगळ्या प्रजातीच्या नावाखाली प्रसिद्ध झाले असले, तरी ते डोसिनिस्का प्रजातीचे असल्याचेही पुण्यातील या पुराजीव वैज्ञानिकांच्या निदर्शनास आले.
मायोसीन कालखंडात, सुमारे दोन कोटी वर्षांपूर्वी सिंध, कच्छ आणि काठेवाड येथे सागर अस्तित्वात होता. त्यातील काही सजीव ईस्ट इंडीज बेटांच्या मार्गे थेट ऑस्ट्रेलिया पर्यंत स्थलांतर करून गेले होते असे या संशोधकांनी याआधी प्रसिद्ध केलेल्या शोध निबंधात साधार दाखवून दिले आहे. याच वेळी भारतीय द्वीपकल्प आणि युरेशिया खंड यामधील सागर तळांवरील गाळ उचलला जाऊन घड्यांचा पर्वत म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिमालय पर्वताच्या निर्मितीचा अखेरचा टप्पा पार पडला. त्यामुळे येथील सागरी प्राण्यांच्या अधिवासाचा संकोच झाला. तसेच हिमालय पर्वताचा अडसर आल्याने या प्राण्यांना उत्तरेकडे स्थलांतर करणे अशक्य होते. जगाच्या पटलावरून नाहीसे होण्याचा धोका टाळण्यासाठी ज्यांना शक्य झाले त्या प्राण्यांनी ईस्ट इंडीज बेटांच्या रोखाने स्थलांतर केले. कालांतराने त्यांचे वंशज नंतर हिंदी आणि  पँसिफिक  महासागराच्या सीमावर्ती भागात स्थिरावले.
या माहितीच्या आधारे कच्छ मध्ये दोन कोटी वर्षापूर्वी सागरी जलाने जो तात्पुरता समुद्र तयार झाला होता, त्या समुद्रात डोसिनिस्का प्रजातीच्या शिंपल्याचे मूळ असल्याचे निष्पन्न होते.
डॉ. विद्याधर बोरकर आणि डॉ. कांतीमती कुलकर्णी यांचा हे संशोधन विषद करणारा       शोधनिबंध जर्नल ऑफ अर्थ सिस्टिम सायन्सेस या वैज्ञानिक नियतकालिकाच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.