जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवणे हा आमचा श्रद्धेचा विषय -चंद्रकांतदादा पाटील

9/10/2019, पुणे: जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवणे हा आमचा श्रद्धेचा विषय असून, आम्ही आमच्या ३० मिनिटाच्या भाषणात पाच मिनिट बोललो तर त्याच गैर काय. किंबहुना राष्ट्रीय अस्मितेचा आनंद व्यक्त केल्याने नागरिकांचा देखील त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. पुण्यामध्ये कलम ३७० आणि ३५ ए या विषयावर आयोजित चर्चा सत्रात ते बोलत होते.

 

यावेळी व्यासपीठावर लडाखचे खासदार जमयांग सेटिंग नामग्याल, पुण्याचे खासदार गिरीश बापट, कार्यक्रमाचे आयोजक शेखर मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते.

 

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, “जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवणे हा आमचा श्रद्धेचा विषय आहे. या विषयासाठी जनसंघाचे संस्थापक आणि आमचे मार्गदर्शक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ‘एक देश मै दोन निशान, दो संविधान नही चलेगा’चा नारा देत बलिदान दिले. जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा झेंडा फडकवण़यासाठी आंदोलनं केली. यासाठी तुरुंगवास भोगला.”

 

ते पुढे म्हणाले की “अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आम्ही जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यासाठी आंदोलन केले. हे आंदोलन माझ्या नेतृत्वाखाली झाले होते. पण यावेळी आम्हाला अटक झाली होती. यानंतर आम्ही तत्कालिन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांची भेट घेऊन तिरंगा झेंडा भेट दिला, आणि तुम्ही तरी हा झेंडा श्रीनगरच्या लाल चौकात फडकवा, अशी विनंती केली होती. आता हाच विषय देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सोडवला आमच्या ३० मिनिटाच्या भाषणात त्याचा आनंद साजरा करणं, यात गैर काय?” असा सवाल उपस्थित केला.

 

काश्मीरमधील या भारतीय अस्मितेच्या मुद्याला सर्व घटकांमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या आनंदामध्ये सहभागी पुण्याची संधी या निमित्ताने आम्हाला मिळत आहे, असेही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

 

लडाखचे खासदार जमयांग सेटिंग नामग्याल म्हणाले की, “जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम आणि ३५ ए हटवल्यानंतर अनेकांना मानवतावादाचे उमारे फुटले आहेत. मुंबई-दिल़लीतील अनेक तथाकथित बुद्धिवजीवी सरकार कशाप्रकारे इथल्या जनतेची मुस्कटदाबी करत आहे, यावर मगराश्रू ढाळत आहेत. पण ३७० आणि ३५ ए मुळे इथली जनता जेव्हा नरकयातना सहन करत होती, त्यावेळी हे बुद्धिजीवी गप्प का होते? त्यांना जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील जनतेच्या यातना दिसल्या नाहीत का?” असा सवाल उपस्थित करुन काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काश्मीर संदर्भातील बोटचेप़या धोरणाची पोलखोल केली.

 

चौकट करणे

कार्यक्रम हाउसफुल

जम्मू काश्मीरमधील कलम 370 संदर्भातील हा कार्यक्रम रद्द झाला अशा आशयाची दिशाभूल करणारे खोडसाळ पोस्ट समाज माध्यमांवर प्रसारीत करण्यात आली होती. कोथरूड विधानसभा च्या निवडणुकीमध्ये काश्मिरच्या 370 कलमाचे काय काम, त्याऐवजी स्थानिक विकासकामांबाबत बोला, असा खास पुणे पुढारी टोला देखील चंद्रकांत दादा पाटील यांना सोशल मीडिया वरून लावण्यात आला होता.

प्रत्यक्षात मात्र सोशल मीडियावरील हा खोडसाळपणा ला आणि विरोधकांच्या कांगाव्याला कोणीही भीक घातली नाही. उलटपक्षी हा कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हाऊसफुल ठरला.