पडद्यामागील कलाकारांनी उलगडल्या कलाविष्कारांच्या ‘प्रकाशवाटा’

 
सूत्रधारतर्फे आयोजित कलाकारांमागील कलाकार टॉक शो अंतर्गत युवा कलाकारांशी साधला संवाद 
पुणे : पांढ-या शुभ्र पडद्यावर कॅनव्हासप्रमाणे ब्रश आणि रंगांची केलेली मुक्त उधळण असो किंवा नाटय-नृत्याद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारे चेह-यावरील भाव असो, कोणताही कलाविष्कार प्रकाशाविना अपूर्ण आहे. चित्रकला, नृत्य, नाटक, सिनेमासह नानाविध कलाकृतींमध्ये लाईटस् म्हणजेच प्रकाशयोजनेचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेकदा केवळ लाईटस्च्या माध्यमातून नाटकांमध्ये संवाद घडविण्याचे कसब कलाकार दाखवितात. अशाच पडद्यामागील कलाकारांनी नृत्य, चित्रकलेसह प्रकाशयोजना अशा कलाविष्कारांच्या प्रकाशवाटा पुणेकरांसमोर उलगडल्या.
सूत्रधारतर्फे पत्रकार नगर येथील कलाछाया येथे कलाकारांमागील कलाकार या टॉक शो अंतर्गत युवा कलाकारांशी संवाद साधण्यात आला. यावेळी प्रकाशयोजनाकार तेजस देवधर, संगीत संयोजक देवेंद्र भोमे, नृत्यांगना अमिरा पाटणकर यांनी त्यांना आलेले अनुभव आणि आठवणींना उजाळा दिला. मधुरा आफळे, तोषल गांधी, वल्लरी आपटे, नताशा पूनावाला यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
तेजस देवधर म्हणाला, ग्रीक थिएटरकडून प्रकाशाचा विचार करीत कलाकृती सादर करण्यास सुरुवात झाली. अगदी सुरुवातीला सूर्यप्रकाश हेच मुख्य माध्यम होते. आपण जे काही सादर करतोय, ते प्रेक्षकांना दिसले पाहिजे, ही प्राथमिक भावना होती. मात्र, कालांतराने तंत्रज्ञानाचा वापर करीत पणत्या, तेल आणि कृत्रिम दिवे असा प्रवास होत गेला. प्रकाशयोजनेतून कलाकाराचे भाव प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे मुख्य काम आम्ही करीत असतो.
देवेंद्र भोमे म्हणाला, गाण्यामध्ये लयीला अत्यंत महत्व आहे. प्रसंगानुसार गाण्यामधील लय बदलते. रसिकांना एका वेगळ्या वातावरणात घेऊन जाण्याचे काम लय करते. संगीतामध्ये लय अत्यंत महत्त्वपूर्ण असून भावना, उर्जा, शब्द आणि वेळ यांची एकत्रित सांगड लयीमधून घातली जाते, असेही त्याने सांगितले. अमिरा पाटणकर हिने अंडयातून आलेल्या पक्षाच्या आकाशामध्ये झेप घेण्यापर्यंतचा प्रवास नृत्याद्वारे उपस्थितांसमोर उलगडला. तर, चित्रकार पार्थ पळसे याने लाईट विथइन अंतर्गत पांढ-या पडद्यावर पेंटिंग साकारले.