चिखली-मोशी-चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनकडून ‘जनजागृती’

Share this News:

– इंद्रायणी थडी जत्रेत सोसायटीधारकांसाठी हक्काचे व्यासपीठ
– शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने सर्वसमावेशक जत्रा

पिंपरी । प्रतिनिधी

सोसायटीधारकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्‍हावे. याकरिता चिखली-मोशी-चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ‘इंद्रायणी थडी’ जत्रेत जनजागृती स्टॉल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे भोसरीसह पुणे जिल्ह्यातील नागरिकांना मनोरंजन, खेळ, खाद्यपदार्थांच्या मेजवाणीसह आपल्या हक्कांची जाणीव करुन देणारी ही जत्रा सोसायटीधारकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवडचे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर महाराष्ट्रातील सर्वात मोठी इंद्रायणी थडी जत्रा भरविण्यात येणार आहे. दि. ३०, ३१ जानेवारी आणि १, २ फेब्रवारी २०२० असे चार दिवस, सकाळी १० ते सायंकाळी १० या वेळेत ही जत्रा नागरिकांसाठी खुली राहणार आहे.

‘महिला सुरक्षा आणि सन्मान’ ही जत्रेची थीम आहे. यासह मनोरंजन, खेळ, ऐतिहासिक पौराणिक देखावे, खाद्यपदार्थ, महिला बचतगाटांची उत्पादने, महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा याची प्रचिती देणारी इंद्रायणी थडी यावर्षी दुसरे पर्व साजरे करीत आहे. यावर्षी प्रथमच इंद्रायणी थडीमध्ये चिखली-मोशी-चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून सोसायटीधारकांना आपल्या हक्कांची माहिती करुन घेता यावी म्हणून स्वतंत्र स्टॉल उभारण्यात येणार आहे, अशी माहिती फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे यांनी दिली.
चिखली-मोशी-चऱ्होली परिसरातील सोसायटीधारकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी हाउसिंग सोसायटी फेडरेशनची स्थापना करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सोसायटीधारकांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी आणि सोसायटीधारकांना मदत करण्यासाठी फेडरेशन काम करीत आहे. रस्ते, पाणी, वीज आदी पायाभूत सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी सोसायटीधारकांना सहकार्य करण्यात येते, असेही सांगळे यांनी सांगितले.

सोसायटीधारकांना काय मिळेल माहिती?

पिंपरी-चिंचवड परिसरात सुमारे तीन हजार गृहनिर्माण संस्था निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक सोसायटीधारकाला बांधकाम व्यावसायाकडून मानसिक आणि आर्थिक पिळवणुकीला सामोरे जावे लागते. तसेच, सदनिकाधारकांची फसवणूक होवू शकते. त्यामुळे सदनिका घेताना कोणत्या कागदपत्रांची चौकशी करावी? कोणती काळजी घ्यावी? याबाबत माहिती देण्यात येणार आहे. घर घेतल्यानंतर सोसायटी कमिटीने कशाप्रकारे काम करावे? त्याचे अधिकार काय? सोसायटीमधील सभासदांचे अधिकार काय? त्याचप्रकरणे बांधकाम व्यावसायिकाकडून सोसायटीचे ‘हॅन्डओव्‍हर’ करीत असताना काय काळजी घ्यावी? कोणत्या कागदपत्रांची पुर्तता करुन घ्यावी. तसेच, मालमत्ता हस्तांतरण (कन्व्‍हीन्स डिड) कशी करावी? या सर्व मुद्यांवर कायदेशीर मार्गदर्शन व मदत मोफत देण्यात येणार आहे, अशी माहिती फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश जुकंटवार यांनी दिली.

सोसायटीधारकांना फेडरेशनचे आवाहन…

सर्व गृहनिर्माण संस्थांनी एकत्र येवून आपल्या न्याय्य हक्कांसाठी त्याचप्रमाणे समस्या सोडवण्यासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे. कारण, कोणत्याही समाजात एकात्मता असेल, तर समाजाची प्रगती होत असते. सोसायटी फेडरेशनचा हेतूच ‘एकी’ हा आहे. ‘युनिटी इज अवज स्टेंन्थ’ असे फेडरेशनचे ब्रीद वाक्य आहे. त्यामुळे परिसरातील सर्व गृहनिर्माण संस्थांनी चिखली-मोशी-चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे सभासद होवून आपल्या न्याय्य हक्काच्या लढ्यात सहभागी व्‍हावे, असे आवाहन फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे यांनी केले आहे.