जेजुरी येथील मल्हारसागर धरणाशेजारी भाविकांसाठी घाट बांधा-खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

Share this News:

पुणे, दि. १९ (प्रतिनिधी) – जेजुरी येथील नाझरे प्रकल्पाच्या मल्हारसागर धरणाशेजारी भाविकांच्या सोयीसाठी चर खोदून छोटा तलाव आणि घाट बांधावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

 

सुळे यांनी याबाबत पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चोपडे यांच्याकडे याबाबत निवेदन दिले आहे. पुरंदर तालुक्यातील जेजुरी हे अवघ्या महराष्ट्राचे कुलदैवत असून राज्यासह देशभरातून येथे हजारो लाखो भाविक येत असतात. देवस्थानच्या पारंपरिक उत्सवाशिवाय रोजसुद्धा याठिकाणी हजारो भाविक दर्शन आणि धार्मिक विधीसाठी येत असतात. त्यांपैकी अनेक भाविक मल्हारसागर प्रकल्पाच्या काठावर धार्मिक विधीसाठी हजेरी लावतात. त्यांच्यासाठी येथे घाटाची आत्यंतिक गरज आहे, असे सुळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

 

सध्या पावसाळ्याचे दिवस असून भर पावसात हे धरण कधीही पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. अशा प्रसंगी अचानक धरण भरले, अथवा कऱ्हा नदीला पूर आला तर याठिकाणी धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकांच्या जीविताला धोका होऊ शकतो. कारण याठिकाणी मुक्काम करून सकळी पहिल्या प्रहरात धार्मिक विधी करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यांची सुरक्षा आणि धार्मिक विधी सुरळीत पार पडावा, यासाठी कालव्याप्रमाणे एखादी चर काढून छोटासा तलाव आणि त्यावर घाट बांधावा, असे सुळे यांनी सुचविले आहे. त्यामुळे समस्त भाविकांची सोय होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.