महिलांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करा : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

Share this News:

मुंबई, दि. 9/8/2019 : मुंबईतील “राईट टू पी” अंतर्गत मुंबई महानगरपालिका आणि म्हाडा यांनी समन्वयाने महिलांना सर्व सोयीने युक्त अशी स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करुन याबाबतचा अहवाल तीन महिन्यात सादर करावा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

“राईट टू पी” अंतर्गत महिलांना स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्यासंदर्भात विधानभवन, मुंबई येथील उप-सभापती यांच्या दालनात बैठक पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या.

◆ म्हाडाने २०१६ नंतर बांधलेल्या शौचालयांचे देखभाल व दुरुस्तीसाठी तत्काळ उपाययोजना करावी तसेच २०१६ पूर्वी बांधलेल्या शौचालयांचे सर्वेक्षण करून त्यासाठी आवश्यक निधीची शासनाकडे अथवा जिल्हा नियोजनकडे मागणी करावी व इतर शौचालये लवकरात लवकर दुरुस्त करून महिलांचे वापरात येण्याच्या दृष्टीने तत्काळ आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी दिले.

◆ संपूर्ण राज्यातील सर्व महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांनी पेट्रोलपंपवरील स्व्च्छतागृहे महिला व पुरुषांकरीता उपलब्ध असल्याची माहिती गुगलवर टाकण्यात यावी, असे निर्देश बैठकीत देऊन मुंबईतील  द्रुतगती मार्गावर प्रयोगिक तत्वावर बाँयो टॉयलेट पंधरा दिवसांत उपलब्ध करुन देण्यात यावे व याबाबतची माहिती गुगलवर देण्यात यावी, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.

◆ स्वच्छतागृहात जाणाऱ्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरा लावणे, बाजारपेठ व उद्यानात स्वच्छतागृहे निर्माण करणे,  बायो टॉयलेटची उभारणी करणेबाबत म्हाडाने किंवा मुंबई महानगरपालिकेने कार्यवाही करुन याबाबतचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असेही निर्देश बैठकीत देण्यात आले.

◆ म्हाडाने स्वच्छतागृहांचे व्यवस्थापन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या निधीचा वापर करुन नादुरुस्त असलेल्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच जाळी लावणे, तुटलेल्या काचा काढून नविन काचा बसविणे, मोठे लाईट्स, फरशी यासारख्या दुरुस्त्या करुन घ्याव्यात, असे निर्देश यावेळी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, म्हाडाचे मुख्याधिकारी शहाजी पवार, मुंबई महानगरपालिका शिवसेना सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, माजी महापौर स्नेहल आंबेकर, नगरसेविका शीतल म्हात्रे,  उप-मुख्य अभियंता मु.झो.सु.मं. म्हाडा,अन्न व नागरी पुरवठा सहसचिव  मनोजकुमार सूर्यवंशी, श्री. सुधीर पाटील, म्हाडाचे उप-अभियंता श्री. प्रशांत धात्रक, अजित पालवे नगरविकास कक्ष अधिकारी, जयंत दांडेगावकर राज्य अभियान संचालक-स्वच्छता महाराष्ट्र अभियान  नागरी, राईट टू पी च्या कार्यकर्त्या सुप्रिया सोनार, मुमताज शेख, रोहिणी कदम, उषा देशमुख, पेट्रोलियम पंपाचे प्रतिनिधी, मुंबई महानगरपालिका अधिकारी, म्हाडाचे अधिकारी उपस्थिती होते.