कसबा विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार मुक्ता शैलेश टिळक यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन

9/10/2019, पुणे – पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासपर्वावर आधारित अनेक विकासाभिमुख उपक्रम भारतीय जनता पार्टीने जनतेसाठी राबवले आहेत. त्यामुळेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही जनता भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास खासदार गिरीश बापट यांनी आज व्यक्त केला.

 

कसबा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार मुक्ताताई शैलेश टिळक यांच्या निवडणूक कार्यालयाचे उदघाटन खासदार बापट यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

 

उमेदवार मुक्ता टिळक, शैलेश टिळक, मतदार संघाचे अध्यक्ष राजेश येनपुरे, प्रमोद कोंढरे, छगन बुलाखे, वैशाली नाईक, शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

‘गेल्या अडीच वर्षात महापौर म्हणून जनतेची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. जनतेच्या उपयोगी असणारे अनेक निर्णय मला घेता आले. कसबा विधानसभा मतदारसंघातील सुजाण नागरिक त्याची नक्कीच दखल घेऊन मला भरघोस मतांनी विजयी करतील असा विश्वास मुक्ता टिळक यांनी व्यक्त केला.
कसबा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाल्यापासून मुक्ता टिळक यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. व्यक्तिगत गाठीभेटी संस्थांच्या भेटी याबरोबरच सकाळ आणि संध्याकाळी मतदारसंघांमध्ये पदयात्रेचे आयोजन करून त्या नागरिकांची संवाद साधत आहेत.