कोथरूडच्या विकासासाठी कटिबद्ध चंद्रकांत दादा पाटील यांचे प्रतिपादन

24/10/2019, पुणे: कोथरूडकर जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार मानून कोथरूडच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून दणदणीत विजयानंतर आज श्री पाटील यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले, यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

पाटील पुढे म्हणाले की, कोथरूडच्या सुज्ञ नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्वांचा शतश: आभारी आहे. या विधानसभा निवडणुकीत कोथरूडच्या विकासाचा जो शब्द इथल्या जनतेला दिला होता, तो पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्याच बरोबर राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने जो जनादेश दिला आहे, त्या बद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले.

यावेळी कोथरूड विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. विजयानंतर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महर्षी कर्वे यांना वंदन केले. तर कोथरूडचे ग्रामदैवत  म्हातोबाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली.