पिंपरी न्यायालय व न्यायाधीश निवासस्थानासाठी निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Share this News:

भोसरी, 11 ऑक्टोबर – पिंपरी न्यायालयाची इमारत मोशी येथील नियोजित जागेवर उभारण्यात येणार आहे. त्या इमारतीसाठी आणि न्यायाधीश निवासस्थानासाठी 124 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

 

पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनील कडूसकर, महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, एकनाथ पवार, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. सतिश गोरडे, शिस्त पालन समिती बार कौन्सिल अॅड. अतिश लांडगे, सचिव गोरख कुंभार, अॅड. महेश टेमगिरे आदी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी (दि. 10) आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ भोसरी येथे आले. त्यावेळी आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पिंपरी-चिंचवड मोशी प्राधिकरण येथील प्रस्तावित असलेल्या न्यायालयाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामात न्यायालयाची ठराविक इमारत आणि न्यायाधीश निवासस्थान बांधण्यात येणार आहे. या पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी 124 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार असोसिएशनच्या पदाधिका-यांना दिले.

 

बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनिल कडूसकर यांचा भाजप प्रवेश

 

पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनील कडूसकर आणि असोसिएशनचे सचिव अॅड. गोरख कुंभार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. भोसरी विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांच्या प्रवेशानंतर बार असोसिएशनच्या पदाधिका-यांनी देखील भारतीय जनता पक्षात आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून प्रवेश केला आहे.