‘आमचे बाप्पा’ प्रदर्शनात चिमुकल्यांच्या १०० इको फ्रेंडली मूर्ती

Share this News:

पुणे, 30/8/2019  : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्वत:च्या हाताने साकारुन लहान वयातच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याकरीता आमचे बाप्पा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. बालविभागापासून ते दहावी पर्यंतच्या मुला-मुलींनी तब्बल १०० शाडू मातीच्या मूर्ती साकारुन आमचे बाप्पा पर्यावरणपूरक बाप्पा असा संदेश यानिमित्ताने पुणेकरांना दिला.

सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे हे स्काऊट-गाईड खुले पथक असून गेली १०० वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. संस्थेतर्फे दरवर्षी शाडूच्या मातीच्या मूर्ती करण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. यंदा १०० हून अधिक मुला-मुलींनी मूर्ती साकारल्या. संस्थेचे मयुरेश काकडे, भाग्यश्री केळकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
मयुरेश काकडे म्हणाले, पर्यावरण रक्षणाचा संदेश केवळ जनजागृतीद्वारे न देता, प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात राबविण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला. स्वत: हाताने साकारलेल्या मूर्ती मुलांनी आपापल्या घरी बसवाव्या, याकरीता हा उपक्रम दरवर्षी घेतला जातो. यंदा देखील याला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून मुला-मुलींनी शाडूच्या मूर्ती करुन पर्यावरणपूरक रंगांनी त्या रंगविल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. शनिवार, दिनांक ३१ आॅगस्टपर्यंत दुपारी ४ ते रात्री ८ यावेळेत सदाशिव पेठेतील स्काऊट ग्राऊंडवर हे प्रदर्शन विनामूल्य खुले आहे.