पारंपरिक वेशात चिमुकल्यांनी साजरा केला दहीहंडी उत्सव 

Share this News:

पुणे 23/8/2019 : गोविंदा रे गोपाळा… च्या जयघोषात पारंपरिक वेश परिधान करीत सदाशिव पेठेतील पंतसचिव स्काऊट क्रीडांगणावर चिमुकल्यांनी दहीहंडी उत्सव मोठया उत्साहात साजरा केला. बाल विभागापासून ते इयत्ता १० वी पर्यंतच्या मुला-मुलींनी एकाहून एक सरस मानवी मनोरे रचून वेगवेगळ्या उंचीवर लावण्यात आलेल्या चार दहीहंडया फोडल्या.

सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे हे स्काऊट-गाईड खुले पथक असून गेली १०० वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. संस्थेतर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन आले. संस्थेच्या अरुंधती जोशी, श्रावणी गोडबोले, आर्यन उभे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. बाल श्रीकृष्णाच्या वेशात आलेले चिमुकले उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.

अरुंधती जोशी म्हणाल्या, बालविभाग व इयत्ता २ री ते १० वीमधील मुला-मुलींकरीता वेगवेगळ्या चार दहीहंडया बांधल्या होत्या. यामध्ये १५० हून अधिक मुला-मुलींनी पारंपरिक वेशात सहभाग घेतला. दहीहंडी उत्सवासह वर्षभर साज-या होणा-या सण-उत्सवांचे महत्त्व चिमुकल्यांना कळावे, याकरीता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दहीहंडीला काल्याचे महत्त्व मुलांना सांगून सर्वांना काल्याचा प्रसाद दिला जातो.