Committed for safe drinking water in Alandi

Share this News:

आळंदीकरांना शुद्ध पाणी देण्यास कटिबद्ध!

– आमदार महेश लांडगे यांचे आश्वासन 

– पिंपरी-चिंचवड आयुक्तांचा आज दौरा
पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून श्री क्षेत्र आळंदी देवाची आणि परिसरात नागरिकांना दूषित पाणी पुरवठा केला जात आहे त्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आळंदीकरांच्या हक्काचा शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी मी कटीबद्ध आहे, असे आश्वासन आमदार महेश लांडगे यांनी दिले आहे. 

श्री क्षेत्र आळंदी आणि परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे, नगरपरिषद प्रशासनाकडून पुरवठा केले जाणारे पाणी हे पिण्यासाठी योग्य नाहीच. इतर वापरासाठीही अयोग्य आहे, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.  महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदीची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच, भाविकांची मोठी वर्दळ असते. आळंदी आणि परिसराला नगरपरिषद प्रशासनाकडून इंद्रायणी नदीवर असलेल्या बंधा-यातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील चिखली, तळवडे आदी परिसरात असलेल्या विविध औद्योगिक कंपन्यांमधून रसायन मिश्रीत पाणी नदीपात्रात सोडले जाते. तेच पाणी पुढे आळंदीकरांना पिण्यासाठी वापरात येते. रसायन मिश्रीत द्रव्यांमुळे इंद्रायणी प्रदूषित झाली आहे, असा संताप आळंदीकरांनी व्यक्त केला आहे. 

दुसरीकडे, आळंदीसाठी पुरविण्यात येणा-या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात आला आहे. पण, या प्रकल्पात अनेकदा तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे प्रक्रिया होणारे पाणीसुद्धा अशुध्दच असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्यास घातक असलेल्या पाण्याचाच नगरपरिषद प्रशासनाकडून पुरवठा होत आहे. त्यामुळे पुणे विभागीय आयुक्तांनी वस्तुस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून आळंदीचा पाणीपुरवठा तात्काळ सक्षम करावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. नगरपरिषद निवडणुकांदरम्यान भाजप पक्षश्रेष्ठींनी आळंदीची जबाबदारी आमदार लांडगे यांच्याकडे सोपवली होती. आळंदीकरांनी आमदार लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपला सत्ता दिली. त्यामुळे आता आमदार लांडगे यांनी आळंदीचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

—————-

पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तांकडून पाहणी

आळंदीमध्ये होणा-या दुषित पाणीपुरवठ्यामुळे लहान मुले व नागरिक आजारी पडू लागले आहेत. नगरपरिषद प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. मध्यंतरी इंद्रायणीच्या प्रदूषणाला पिंपरी-चिंचवडकर कारणीभूत आहेत, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे आळंदीच्या पाणीपुरवठ्याबाबत पिंपरी-चिंचवडकर महापालिकेनेही सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी नवनियुक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे आमदार महेश लांडगे यांनी केली होती. यावर आयुक्त हर्डीकर महापालिका हद्दीतील चिखली, तळवडे आदी भागातून इंद्रायणी नदीची पाहणी करणार आहेत. त्याआधारे नदी प्रदूषण रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, याचा अभ्यास करुन कार्यवाही करण्यात येणार आहे.