समस्या सुटत नसतील तर थेट माझ्याशी संपर्क साधा : पोलीस आयुक्त पद्मनाभन

Share this News:

पिंपरी, 25 ऑगस्ट 2019 : महिलांची छेडछाड, गुंडगिरी, चो-यामा-या यांसह गुन्हेगारी विषयक समस्या कंट्रोल रुम अथवा चौकींमध्ये कळवूनही त्या सुटत नसतील तर तुम्ही जबाबदरीने माझ्याशी संपर्क साधा. तुमच्या समस्या तर सुटतीलच, पण बेजबाबदार पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांवर देखील कारवाई केली जाईल, अशी सूचना पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी नागरिकांना केली.

चिखली-मोशी हौसिंग सोसायटी फेडरेशन यांच्या वतीने आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गृहनिर्माण सोसायटींतील नागरिक आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त यांच्यात आज रविवारी (दि. 25) मुक्त संवाद घेण्यात आला. चिखली येथील सिटी प्राईड स्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार महेश लांडगे, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, महापौर राहूल जाधव, नगरसेविका आश्विनी जाधव, मंगल जाधव यांच्यासह गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणारे नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आर. के. पद्मनाभन म्हणाले की, शहरातील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटींसाठी एक पोलीस कर्मचारी नेमला आहे. तक्रार पेटींची व्यवस्था केली आहे. सुज्ञ नागरिकांना निनावी तक्रारी अर्ज करावेत, अशी सूचना देखील केली गेली. सुरूवातीच्या काळात प्रत्येक सोसायटींमधून चांगला प्रतिसाद मिळाला. काही दिवसानंतर लोकांनी तक्रारी अर्ज करणे बंद केले आहे. याचा अर्थ त्याठिकाणी समस्या नसल्याचा भास होत आहे. तरी, आजही गुन्हेगारी विषयक प्रश्न असतील तर तुम्ही कंट्रोल रुमला फोन करून माहिती कळवा. काही मिनिटांत पोलीस त्याठिकाणी येणार यात शंका नाही. जर, पोलीस आले नाहीत. किंवा आपली तक्रार पोलीस चौकीत घेतली नाही. तर, तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधा. त्यानंतर तुमच्या समस्या सुटतील, पण बेजबाबदारपणे वागणारा पोलीस कर्मचारी असेल तर त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल. तसेच, सोसाटींमधील सुरक्षा रक्षकाला गाड्या धुवायला लावू नका. त्याला सुरक्षेचे काम करू द्या. सीसीटीव्ही कार्यरत ठेवा. अवैध वाहतुकीच्या संबंधीत पोलीस चांगले काम करत आहेत. 1 सप्टेंबरपासून वाहतुकीचे नवीन नियम लागू होत आहेत. त्यानुसार कामाच्या पध्दतीत बदल करण्यात येणार आहे, असेही पद्मनाभन यावेळी म्हणाले.

यावेळी सोसायट्यांमध्ये राहत असलेल्या नागरिकांचा मुक्त संवादाला उत्तम प्रतिसाद मिळाला. रहिवाशांनी आपापल्या सोसायटींमध्ये भेडसावत असलेल्या गुन्हेगारी व असुरक्षीततेबाबतच्या समस्या मांडल्या. आयुक्त पद्मनाभन यांनी नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाला खेळीमेळीत उत्तरे दिली.

माझे नाव असणा-या वाहनांवर देखील कारवाई करा – आमदार महेश लांडगे

चिखली, मोशी भागातील 165 सोसायट्या मिळून फेडरेशनची निर्मिती झाली आहे. या सोसायट्यांमध्ये राहणा-या महिला भगिनी नोकरीनिमित्त बाहेर जातात. नोकरी करून परतल्यानंतर त्यांना रस्त्यावर सोडले जाते. अशावेळी महिलांची छेडछाड करण्याचे प्रकार घडतात. त्याला आळा बसला पाहिजे. कुदळवाडीत भंगारची दुकाने आहेत. त्याठिकाणी अवैध धंदे चालतात. अक्षरशः रस्त्यांवर दारू, ताडी, घावटी दारू विक्री होते. हे धंदे बंद झाले पाहिजेत. चिखली ते मोशी या मुख्य रस्त्याला जोडणा-या अंतर्गत रस्त्यांवर बेकायदेशीर मोठी वाहने लावली जातात. या अंतर्गत रस्त्यांवर नो पार्किंग झोन तयार करा. त्याठिकाणी कोणाचीही गाडी लावलेली आढळल्यास त्यावर कारवाई करा. माझे नाव गाडीवर लिहिलेले असेल तर त्या गाडीवर देखील कारवाई करा, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी पोलीस आयुक्त पद्मनाभन यांना केल्या.