जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले नुकसानीचे पंचनामे तात्‍काळ करण्‍याचे आदेश

पुणे, दि. 1 – पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे ग्रामीण भागामध्ये खरीप, बागायती, जिरायती, हंगामी पिके, तसेच फळबागांना मोठा फटका बसला असून मोठया प्रमाणामध्ये शेती क्षेत्र बाधीत झाले आहे. तसेच शहरी भागामध्ये घरांचे नुकसान झाले आहे. याबाबतचे पंचनामे 4 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. संबंधित तालुकयाचे तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी संयुक्‍तपणे पंचनामे करावे, असेही जिल्‍हाधिकारी राम यांनी स्‍पष्‍ट केले.

जिल्हा प्रशासनाकडून आपदग्रस्तांना तातडीने करावयाची मदत देण्यात आली आहे. महानगरपालिका तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत देखील पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. याविषयी तात्काळ कार्यवाही करुन प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राम यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले.

राज्यातील अतिवृष्टी व पुरपस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडीओ कॉन्फरसींगद्वारे संवाद साधला. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्हयात झालेल्या अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे बाधीत झालेल्या कुटूंबांना देण्यात येणा-या मदतीबाबत व त्यांच्या पुनर्वसनाबाबत तसेच ग्रामीण भागातील पिकांचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. या यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या तपशीलावरुन संबंधितांना नुकसान भरपाई मिळण्याकरीता जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी दिली. नुकसानीबाबत काही शंका असल्‍यास टोल फ्री नंबर 1077 आणि पुणे येथील आपत्‍ती नियंत्रण कक्षाचा क्रमांक 02026123371 येथे संपर्क करावा, असे आवाहनही करण्‍यात आले आहे.